मोठे ड्रग्ज पेडलर आल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप
ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्जसंदर्भातील अनेक धक्कादायक प्रकरणं उघडकीस येत आहे. खुलेआमपणे ड्रग्जची विक्री करुन त्याचे सेवन केले जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पुण्यात काही दिवसांपूर्वी पब्जमध्ये ड्रग्जचे सेवन करत असलेल्या तरुण तरुणींचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता ठाण्यात रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील येऊर येथे रेव्ह पार्टी झाल्याचा दावा केला आहे.
ठाण्यातील येऊर येथे रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. सगळ्यात मोठे ड्रग्ज पेडलर हे येऊरमध्ये फिरत होते, असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. वर्ल्डकप विजयाच्या जल्लोषाच्या नावाखाली रेव्ह पार्टी झाल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच अशा धक्कादायक घटना घडत असल्याने राज्यात ड्रग्जचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी एक्स सोशल मिडियावर पोस्ट करत हा गंभीर आरोप केला आहे. “कोणतीही भीती नाही. भीती नाही. येऊरमधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये सर्व प्रकारची ड्रग्स उपलब्ध होती. सर्व टॉप पेडलर्स देखील मुक्तपणे फिरत होते. वर्ल्डकपच्या आनंदोत्सवाखाली हे सुरु होतं. तसेच ट्रॅफिक हे मॅचमुळे नाही तर रेव्ह पार्टीमुळे झाली होते. या रेव्ह पार्टीमध्ये ८० टक्के लोक हे मुंबईमधील होते,” असे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टमध्ये ठाणेपोलिसांना टॅग केले होते. ठाणे पोलिसांनी या पोस्टवर, “ठाणे शहर पोलिसाशी संपर्क केल्याबद्दल धन्यवाद, आपली माहिती वर्तकनगर पोलीस ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे,” असे उत्तर दिलं आहे.