नवी मुंबई : महानगरपालिकेतील प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांनी आपल्या पदाची जबाबदारी चांगल्या रितीने पार पाडल्यामुळेच आज नवी मुंबईचा नावलौकिक सर्वत्र आहे. त्याचप्रमाणे सेवानिवृत्ती समारंभात अधिकाऱ्यापासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांना समान न्याय देत नवी मुंबई महानगरपालिकेने इतरांनी अनुकरण करावा असा पायंडा पाडला असल्याचे मत अतिरिक्त् आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी व्यक्त केले. सेवानिवृत्तीच्या दिवशीच नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांना सेवेचे देय्य लाभ मिळावेत अशा प्रकारच्या महापालिका आयुक्त डॉ.केलास शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रशासनाने कार्यवाही पूर्ण केली असल्याचा विशेष उल्लेख त्यांनी मनोगतात केला.
माहे जून 2024 मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या 13 अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांच्या मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झालेल्या सेवानिवृत्ती समारंभ प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, महापालिका सचिव श्रीम.चित्रा बाविस्कर, अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
जून 2024 मध्ये सेवानिवृत्त होणारे कार्यकारी अभियंता श्री.गिरीश गुमास्ते व श्री.जयकुमार चिंचोळे, मुख्याध्यापक श्री.इंद्रप्रकाश पाल, अग्निशमन केंद्र अधिकारी श्री.जगदीश पाटील व सहा.अग्निशमन केंद्र अधिकारी श्री.विजय शेडगे, स्वच्छता अधिकारी श्री.दिनेश वाघुळदे, प्राथमिक शिक्षिका श्रीम.छाया पाटील, वरिष्ठ लिपिक श्री.मोहन पाटील, आरोग्य सहाय्यक श्री.भूषण ढबाळे व श्री.अनिल पाटील, आरोग्य सहाय्यक (महिला) श्रीम.केरबिन डिसोझा व श्रीम.नम्रता गायकवाड आणि वाहनचालक श्री.अशोक पाटील अशा 13 अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांना मान्यवरांच्या शुभहस्ते शाल, पुष्पगुच्छे व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी अनेक अधिकारी, कर्मचारी यांनी मनोगते व्यक्त करीत सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबतचे अनुभव कथन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सत्कारमुर्तींच्या वतीने प्रातिनिधीक स्वरूपात कार्यकारी अभियंता श्री.गिरिष गुमास्ते यांनी मनोगत व्यक्त केले व सत्काराबद्दल आभार मानले.
0000000
