वाहन मालकांच्या प्रतीक्षेत खांदेश्र्वर पोलीस
राज भंडारी
पनवेल : शहरात रस्त्याच्या कडेला असलेल्या बेवारस वाहनांप्रमाणेच पोलीस ठाण्यांमध्ये धूळ खात पडून असलेल्या वाहनांची मोठी समस्या आहे. या वाहनांच्या मालकांचा शोध घेतला जातो. मात्र, गाडीमालकांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पोलीस ठाण्यांच्या आवारात अशा वाहनांचा खच लागत असून प्रदूषणासह अनेक समस्या उद्भवत आहेत.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत खांदेश्र्वर पोलीस ठाण्यांमध्ये अशीच २० वाहने धूळखात पडली आहेत. त्या वाहनांच्या मालकांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. पोलीस ठाण्याकडून यापूर्वीही मोहीम राबवून गाड्यांच्या मालकांचा शोध घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा गाड्यांची भर पडली आहे. खांदेश्र्वर पोलीस ठाण्याच्या आवारात १६ दुचाकी, २ चारचाकी आणि २ ऑटो रिक्षा आपल्या मालकांच्या प्रतीक्षेत आहेत. सदर वाहने वाहन मालकांनी त्वरित घेवून जाण्यासाठी खांदेश्र्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाय. टी. चव्हाण यांच्या सहीचे प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये वाहन मालकांना आपापले वाहन घेवून जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
