रायगड :रायगड जिल्हा हद्दीतील भोर-महाड-वरंध घाट हा रस्ता कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने अवजड वाहतूकीसाठी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.

रायगड जिल्हा हद्दीतील भोर-महाड- वरंध घाट हा रस्ता प्रमुख राज्य मार्ग क्र.१५ नवीन अधिसूचित पंढरपूर-भोरमहाड राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५, डीडी किमी ६०/००० (राजेवाडी) ते किमी ८२/०० (वाघजाई मंदिराजवळ) या ठिकाणी दि.१९ जून २०२४ रोजी झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे दरड कोसळून रस्ता खचला गेला असून त्यामुळे या ठिकाणी रस्ता वाहतूकीसाठी अत्यंत अरुंद व धोकादायक झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५ डीडी किमी ६०/००० (राजेवाडी) ते किमी ८१/६०० (रायगड जिल्हा हद्द) वरंध घाट दरम्यानची सुमारे २१.६०० कि.मी. लांबी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारीतील आहे. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने दरड कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडल्याने जिवीत व वित्तहानी होण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. सद्य:स्थितीत महाड तालुक्यामध्ये पावसाची परिस्थितीनुसार या भागातील डोंगररांगामधून वाहणाऱ्या पाण्यासोबतच दरड, डोंगरावरील झाडे महामार्गावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून वरंध घाटातून प्रवास करणाऱ्या तसेच मालाची ने-आण करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सदरचा महाड हद्दीमधील राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५ डीडी किमो ६०/००० (राजेवाडी) ते किमी ८१/६०० हा घाटाचा भाग कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने अवजड वाहतूकीसाठी दि.३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. सदर कालावधीकरीता रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद करणेबाबत कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण आणि पोलीस अधीक्षक रायगड यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हाधिकारी यांची खात्री झाली आहे. त्यानुसार नागरिकांनी पुण्याकडे जाण्यासाठी महाड-माणगांव-निजामपूर-ताम्हिणी घाट-मुळशी-पिरंगुट-पुणे असा मार्ग वापरावा तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळूण-पाटण-कराड-कोल्हापूर असा मार्ग वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *