ठाणे, ता. १५ : जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, बालकांच्या कला-गुणांना वाव मिळावा, उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी आरोग्य व शिक्षणाचा सातारा जिल्हा पॅटर्न ठाण्यात राबवण्यात यावा, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या, तसेच या उपक्रमांत ग्रामीण भागासह पालिका क्षेत्रातील पालिकेच्या शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राचादेखील समावेश करावा, अशा सूचनादेखील देसाई यांनी दिल्या.

जिल्हा नियोजन विकास समितीची बैठक शनिवारी (ता. १३) नियोजन भवनात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री शंभूराज देसाई होते. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी २०२४-२५ च्या वार्षिक ९३८ कोटींचा अंतिम नियतव्यय मंजूर झाल्याची माहिती दिली, तसेच ३० टक्के निधी प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, उर्वरित संपूर्ण निधी प्राप्त होईल, त्यात एकही रुपया कमी होणार नाही, असे आश्वासनदेखील त्यांनी दिले, तसेच जिल्ह्यातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी १४ प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक विभागाच्या १३ शाळांची ”मॉडेल शाळा” उपक्रमांतर्गत निवड केल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मॉडेल शाळांसाठी प्रयोगशाळा, स्मार्ट ग्रंथालय, मुला-मुलींचे स्वतंत्र शौचालय, अपंगांसाठी गणित आणि विज्ञान विषयासाठी लॅब, क्रीडा विकास, शाळांमध्ये सौर पॅनल आदी गोष्टींचा समावेश शाळा मॉडेलमध्ये करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिली. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि निमंत्रित सदस्यांची उपस्थिती होती.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *