शिक्षकांच्या ८०० पदांबरोबर तृतीय, चतुर्थ श्रेणीची एकूण १७०० पदे रिक्त
ठाणे, ता. १७ : ठाणे जिल्हा परिषदेत गेल्या काही महिन्यांपासून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याने कर्मचाऱ्यांची पोकळी निर्माण झाली आहे. त्यानुसार तृतीय व चतुर्थ श्रेणीची एक हजार ७०० पदे रिक्त असल्याची बाब समोर आली असून, यामध्ये ८०० पदे ही शिक्षकांची असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे कामाचा सर्व भार उर्वरित कर्मचाऱ्यांवर आला असून त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या कार्यक्षमतेवर होत आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ आणि कल्याण या तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासकामांबरोबरच येथील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे जबाबदारी ठाणे जिल्हा परिषदेच्या खांद्यावर आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील महत्त्वाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे विकासात्मक कामे करताना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. त्यात गेल्या महिन्यापर्यंत ग्रामीण पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम विभागाचा अतिरक्त पदभार उपअभियंत्यांच्या खांद्यावर होता. मात्र, या दोन्ही विभागांना पूर्णवेळ अधिकारी मिळाल्याने येथील कामकाज सुरळीत सुरू झाले आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये अवघ्या सहा ते सात महिन्यांसाठी अधिकारी मिळाल्यानंतर पुन्हा दीड ते दोन महिने प्रभारी अधिकाऱ्यांकडे कार्यभार दिल्यानंतर पुन्हा अवघ्या दोन ते तीन महिन्यांसाठी अधिकारी मिळाल्यानंतर पुन्हा प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची गती मंदावली असून लाभार्थ्यांनाही त्याचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, ठाणे जिल्हा परिषदेच्या सेवेतील मेमध्ये ८१ अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर जुलैमध्ये पुन्हा ३१ अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे भरती प्रक्रिया होत नसल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांची पोकळी निर्माण होत आहे. त्यानुसार वर्ग क ची सरळ सेवेअंतर्गत सर्वाधिक एक हजार ३५७ पदे; तर पदोन्नतीची ३०० पदे रिक्त असून वर्ग ड ची सरळसेवेअंतर्गत २१ पदे; तर पदोन्नतीची ४२ पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे.
वर्ग दोन व तीनची २६३ पदे रिक्त
एकीकडे ठाणे जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, ‘वर्ग २’ च्या अधिकाऱ्यांचीदेखील रिक्त पदांची जंत्री अधिक आहे. यामध्ये शिक्षण विभागातील मुख्याध्यापक (प्रा) ते केंद्र प्रमुखांची १९८ पदे रिक्त आहेत. त्यापाठोपाठ ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील २४, बांधकाम विभागातील १५, लघु सिंचन मधील १०, अर्थ आणि कृषी विभागातील प्रत्येकी ६, सामान्य प्रशासन विभाग्तील ३ तर, आरोग्य विभागातील साथरोग वैद्यकीय अधिकाऱ्याचे एक पद रिक्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
