अनिल ठाणेकर
ठाणे : कळवा येथील राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात आज विठू भक्तांची मांदियाळी आली. चंद्रभागा नदीत अभिषेक करून आणलेल्या विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी सबंध कळवेकरांची रिघ लागली होती. या वेळी काढलेल्या दिंडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.जितेंद्र आव्हाड हे भक्तिरसात तल्लीन झाल्याचे चित्र दिसून आले. वारकऱ्यांच्या सोबत त्यांनीही टाळमृदंगाच्या गजरात चक्क फुगडीचा फेरही धरला.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात जाऊन विठूरायाचे दर्शन घेण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र, सर्वांनाच वारीत सहभागी होणे शक्य नसते. ही अडचण ओळखून डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी विठ्ठल – रखुमाईची मूर्ती पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत अभिषेक करून कावेरी सेतू येथील पक्ष कार्यालयाच्या आवारात विधिवत स्थापन केली होती. या मूर्तीसमोर नतमस्तक होण्यासाठी कळवा, विटावा, खारीगाव, पारसिकनगर, कळवा पूर्वेतील विठ्ठल भक्तांनी एकच गर्दी केली होती. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराप्रमाणेच येथेही मांगल्य आणि पवित्रते वातावरण निर्माण झाले होते. या ठिकाणी डॉ.जितेंद्र आव्हाड हेदेखील विठूरायाच्या चरणी लीन झाले. या प्रसंगी विठ्ठल भक्तांनी काढलेल्या दिंडीत डॉ. आव्हाड हे तल्लीन होऊन सहभागी झाले. वारकऱ्यांसोबत त्यांनीदेखील टाक वाजवत, विठ्ठलाच्या गाण्यांवर ठेका धरला तसेच फुगड्यांचा फेरही धरला.
0000
