भजनी मंडळींचा रेल्वे स्थानकात दिंडी सोहळा

 

 

मुंबई : विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा… ज्ञानोबा माउली तुकाराम, असे म्हणत मुंबईतील वारकऱ्यांच्या अनेक दिंड्या सकाळी ७.३० वाजल्यापासून चर्चगेट स्थानकात दाखल झाल्या. यामध्ये श्री संत सेवा भजन सामाजिक संस्थेच्या अंतर्गत एकूण १५० रेल्वे प्रवासी भजन मंडळांचा समावेश होता. सकाळपासून एकूण ४८ पालख्या आणि दिंड्या चर्चगेट स्थानकात दाखल झाल्या, तर इतर भजनी मंडळांनी स्थानकाला भेट दिली. विठू माउलीचा गजर करून फुगडी घालणे हा आनंद वेगळाच असल्याचे मत यावेळेस भाविकांनी व्यक्त केले.

दरवर्षीप्रमाणे स्व. ढोकेमामा रेल्वेप्रवासी सांस्कृतिक व सामाजिक संस्थेच्या भजनी मंडळांनी मालाड ते चर्चगेट असा प्रवास करत संपूर्ण चर्चगेट परिसर भजनाने दणाणून टाकला. यावेळेस या मंडळांच्या तरुणांनी आपल्या दिंडीच्या माध्यमातून गोरा कुंभाराची कथा मांडली. ही कथा पाहण्यासाठी भाविकांनी, नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या भजनी मंडळातील आशीष रेवाळे आणि प्रवीण नार्वेकर यांनी भजनाच्या तालावर उपस्थित सर्व नागरिकांना नाचण्यास भाग पाडले. टाळ, मृदुंग, पखवाज आणि विठूरायाची गाणी गाऊन संपूर्ण चर्चगेट स्थानक दुमदुमून गेले होते. ज्ञानोबा माउली तुकाराम असा गजर करत वारकऱ्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती केली. या सर्व भक्तिमय वातावरणात मुंबईकर प्रवाशांनाही मोह आवरला नाही. लहान, थोर स्त्रिया, पुरुष, ज्येष्ठ नागरिक सर्वच या दिंडीत सहभागी झाले होते.

ट्रेनमध्ये भक्तिमय वातावरण

कांदिवलीचे सद्गुरु कृपा भजन मंडळाचे यावर्षीचे ३७ वे वर्ष होते. संस्थापक अरुण पाटील, अध्यक्ष अंकुश लोटेकर यांनीदेखील वारीत सहभाग दर्शवला, तर विरारच्या संत कृपा भजन मंडळाचे यंदा १३ वे वर्ष असून मंडळाचे अध्यक्ष दिलीप राणे यांनी सांगितले की, आषाढीनिमित्त आम्ही दरवर्षी विरार ते चर्चगेट असा प्रवास करतो. ट्रेनमध्ये भक्तिमय वातावरणात माउलींची पूजा केली जाते आणि ट्रेनमध्ये भजन गाणी गात आम्ही चर्चगेटपर्यंत पोहोचतो. यावेळेस उत्साह वेगळा असतो. गुरू माउली भजन मंडळ, ब्रम्हानंद भजन मंडळ ही भजनी मंडळेही सहभागी झाली होती.

१५० पैकी ५० भजनी मंडळांनी आज (ता. १७) पालखी चर्चगेट स्थानकात आणल्या. येणाऱ्या पालख्यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाते. सकाळी साडेसात वाजल्यापासून पालखी सुरू होतात. मानाची पहिली पालखी निघाली की एक-एक पालखी यायला सुरुवात होते. दुपारपर्यंत आलेल्या पालख्या रिंगण करतात आणि आरती झाल्यावर कार्यक्रमाची सांगता होते.

मोफत खिचडी वाटप

इस्कॉन फूड रीलिफ अन्नामृत फाऊंडेशनतर्फे दरवर्षी मोफत राजगिरा लाडू आणि साबुदाणा खिचडीचे वाटप केले जाते. स्थानकात येणाऱ्या भाविकांसह दिंडीत सहभागी होणाऱ्या माउलीसाठी, सदस्यांसाठी खिचडीचे वाटप करण्यात आले. जवळपास पाच ते सहा हजार भाविकांनी या खिचडी प्रसादाचा लाभ घेतला. संस्थेने एकूण ६० डबे आणले होते. जवळपास साडेसहाशे किलो खिचडी वाटली गेली, तर मंगेश शेट्ये यांनी केळीच्या वेफर्सचे वाटप केले.

000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *