विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर महिनाभरात १, ८१३ गुन्हे
मुंबई, ता. १७ : घराजवळील बाजारात-दुकानात जाण्यासाठी, मुलांना शाळेत सोडण्यासाठी अशी विविध कारणे देत काही वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहने चालवतात. अशा बेशिस्त चालकांमुळे अनेकदा अपघात होतात. शिवाय वाहतुकीची कोंडी होते. अशा बेशिस्त वाहनचालकांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी गेल्या महिनाभरात केलेल्या कारवाईत एक हजार ८१३ वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
मुंबईत सध्याच्या घडीला तब्बल ४७ लाख वाहनांची नोंद आहे. वाहनांची संख्या पाहता रस्त्याची लांबी कमी आहे. शहरात पार्किंगचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यातच शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी दिसून येते. अशातच काही वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहन चालवितात. त्यामुळे बऱ्याचदा वाहतुकीची कोंडी होते. शिवाय अपघातदेखील होतात. चालकांना वाहतुकीची शिस्त लागावी, यासाठी १५ जून ते १४ जुलैदरम्यान मुंबई वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबविली होती. या मोहिमेत विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या एक हजार ८१३ चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी एक हजार ७९८ जणांवर कलम २८१ अन्वये शहरातील विविध पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केले आहेत, तर ७३२ वाहने वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
00000
