नवी मुंबई : बेलापूर सेक्टर 12 येथे सिडको कालीन 40 वर्ष जूनी पावसाळी जलउदंचन केंद्राची जीर्ण झालेली इमारत तोडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधणे तसेच नवीन पंपींग मशीनरी बसविणे या कामामुळे सीबीडी बेलापूर परिसरातील पावसाळी कालावधीत काही भागात पाणी साचण्याची समस्या निकाली निघणार असून आनंददायी शहर निर्मितीच्या दृष्टीने ही महत्वाची सुविधा असल्याचे मत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी व्यक्त केले. याकामी बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदाताई म्हात्रे यांचे मोलाचे सहकार्य लाभले याचा उल्लेख आयुक्तांनी केला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बेलापूर विभागातील से.12 येथे नवीन पावसाळी जलउदंचन केंद्र बांधणे कामाचा भूमीपूजन समारंभ प्रसंगी आयुक्त आपले मनोगत व्यक्त् करीत होते. याप्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे, अतिरिक्त् आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, परिमंडळ 1 चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे, सहा आयुक्त तथा विभाग अधिकारी शशिकांत तांडेल, कार्यकारी अभियंता संजय पाटील व अजय संखे, माजी नगरसेवक अशोक गुरखे, निलेश म्हात्रे, भरत जाधव, दिपक पवार, दिनानाथ पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कामाचा कालावधी 14 महिने असला तरी हे काम 12 महिन्यात पूर्ण करावे असे सूचित करीत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी होल्डींग पाँड हे शहराचे संरक्षक असून त्यात गाळ साचल्याने व खारफुटी वाढल्याने त्याची पाणी धारण क्षमता कमी झाली असल्याचे सांगितले. त्यामुळे मोठया भरतीच्या वेळी अतिवृष्टी झाल्यास आपले शहर समुद्र सपाटीच्या भरतीरेषेपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने शहराच्या सखल भागात पाणी साचते याचा अनुभव आपण 21 जुलैला झालेल्या अतिवृष्टीच्या काळात दुपारी घेतला. या पाणी साचण्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने पाणी साचलेल्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करत कारणे जाणून घेतली. त्यामध्ये होल्डींग पाँडची सफाई करणे अत्यंत गरजेचे असल्याचे लक्षात आले आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका तत्परतेने आवश्यक परवानग्या घेण्याची कार्यवाही करेल असे आयुक्त म्हणाले.
यावेळी बोलताना आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवीन पावसाळी जल उदंचन केंद्र बांधण्यात येत असल्याने बेलापूर विभागातील नागरिकांच्या वतीने आनंद व्यक्त केला. यामुळे विशेषत्वाने सीबीडी बेलापूर येथील से.4,5,6 भागातील इमारती रस्त्यापासून सखल भागात येत असल्याने त्याठिकाणी भरतीच्या व पावसाच्या काळात जमा होणा-या पाण्याचा त्रास यापूढे होणार नाही याचा विशेष उल्लेख केला. अतिवृष्टीमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होईपर्यंत या भागातील नागरिकांना होणारा त्रास स्वत: अनुभवला असल्याचे सांगून त्यांनी या कामाचा पाठपुरावा केल्याची माहिती दिली.
पावसाळी जल उदंचन केंद्राचे जीर्ण बांधकाम तोडून नवीन जल उदंचन केंद्राची इमारत बांधण्यासाठी सीआरझेडचा ना हरकत दाखला प्राप्त झाला असून साधारणत: 34 कोटी रक्क्म खर्च करुन ही इमारत व तेथील यंत्रणा उभारण्यात येत आहे.
