मुंबई : आर्थिक सुधारणांना प्रारंभ होऊन पावशतकापेक्षा अधिक काळ उलटला. याकाळातील सर्व सरकारांकडून भरघोस सवलती, सोईसुविधा घेऊन प्रचंड नफा कमाविणार्या खाजगी क्षेत्रातील उद्योगांनी देश उभारणीच्या कार्यात दिलेले अत्यल्प योगदान निराशाजनकच नव्हे तर चिंताजनकही असल्याचे मत  रमा प्रकाशनाच्या केंद्रीय अर्थसंकल्प विश्लेषण कार्यक्रमात व्यक्त करण्यात आले.
विलेपार्ले पूर्व येथील साठ्ये कॉलेजच्या सभागृहात आयोजिण्यात आलेल्या यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्प विश्लेषण कार्यक्रमांत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर, डॉ.निशीता राजे तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी यांनी,केंद्र सरकारच्या कर उत्पन्नात कार्पोरेट  क्षेत्रापेक्षा  व्यक्तिगत करदात्यांंचा हिस्सा मोठा आहे, इकडे लक्ष वेधले.
श्री.तारदाळकर म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत सरकाचा भांडवली खर्च दोन लाख कोटींवरून यंदा ११.११ लाख कोटींवर पोहोचला म्हणजे पाच पटीने वाढला. त्या तुलनेत खाजगी क्षेत्राकडून पायाभूत सुविधा उभारण्यासाठी म्हणावी तशी तरतूद केली गेली नाही ही चिंता जनक बाब आहे. डॉ.निशीता राजे यांनी सांगितले की, सरकारच्या भांडवली खर्चाचा मल्टीप्रायर इफेक्ट होतो.सरकार जेव्हा एक रुपया भांडवली खर्च करते तेव्हा अर्थव्यवस्थेला तीनपट गती मिळते.त्या द्रष्टीनेही मूलभूत सुविधा उभारण्यासाठी खाजगी क्षेत्राकडून गुंतवणूक वाढली पाहिजे. अर्थात अर्थसंकल्पातील काही चांगल्या तरतूदींमुळे खाजगी क्षेत्राकडून गुंतवणूलेलक वाढावी यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे.
तर, नगर विकासाच्या नव्या योजना आखताना जुन्या “स्मार्ट सिटी” योजनांची फलश्रुती काय आहे हे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट करायला हवे होते असे प्रकाश कुलकर्णी म्हणाले. मोठमोठे  हमरस्त्ये, उड्डाण पूल, बोगदे यांची उभारणी सुरू असताना मुंबईसारख्या महानगरातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा दूर करण्यासाठी लक्ष द्यावे लागेल याची जाणीव कुलकर्णी यांनी दिली.
जोरदार पाऊस पडत असतानाही या अर्थसंकल्प विश्लेषण कार्यक्रमाला पार्लेकरांनी चांगला प्रतिसाद दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *