रायगड : २९ जुलै २०२४ रोजीनंतर मैदानी चाचणीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना पोलीस भरती प्रक्रियेत समावून घेतले जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग तथा अध्यक्ष, रायगड जिल्हा पोलीस भरती समिती, सोमनाथ घार्गे यांनी दिला आहे.
रायगड जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील ३९१ (०९ बॅन्डस्मन पदे समाविष्ट) व पोलीस शिपाई चालक संवर्गातील ३१ रिक्त पदे भरण्याकरीता सन २०२२-२०२३ ची भरती प्रकीया दि. २१ जून २०२४ रोजीपासून सुरु आहे. या भरती प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणी न झालेल्या पुरुष उमेदवारांनी सोमवार, दि.२९ जुलै २०२४ रोजी सकाळी ०६.०० वा.मैदानी चाचणीकरीता जिल्हा क्रिडा संकुल, नेहुली, ता. अलिबाग, जि.रायगड येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे. दि.२१ जून २०२४ ते दि.२३ जुलै २०२४ या कालावधीत पुरुष उमेदवार यांची मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे. या कालावधीत पावसामुळे, एकाच दिवशी व लागोपाठचे दिवशी दोन पदांकरीता मैदानी चाचणीसाठी किंवा लेखी परीक्षेसाठी हजर राहण्याबाबत स्थिती निर्माण झाली किंवा प्रासंगिक कारणांमुळे ज्या पुरुष उमेदवारांनी अद्यापपर्यंत रायगड जिल्हा पोलीस घटकाची मैदानी चाचणी दिली नाही, अशा पुरुष उमेदवारांना संधी/मुभा देण्यात येत आहे. पुरुष उमेदवार यांना ही शेवटची संधी देण्यात येत असून त्यानंतर शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात येणार नाही. दि. २९ जुलै २०२४ रोजीनंतर मैदानी चाचणीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत समावून घेतले जाणार नाही. असा इशारा पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग तथा अध्यक्ष, रायगड जिल्हा पोलीस भरती समिती, सोमनाथ घार्गे यांनी दिला आहे.
0000
