ठाणे : श्री माँ गुरुकुल आणि अॅस्पिरेंट्स टेबल टेनिस अॅकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील घोडबंदर रोड येथील श्री माँ स्नेहदीप सभागृहात पहिल्या 4 स्टार टेबल टेनिस रँकिंग स्पर्धेचे पाच दिवस आयोजन केले गेले. या स्पर्धेत मुंबई मध्य जिल्हा आणि ठाणे जिह्यातून तब्बल 425 खेळाडू सहभागी झाले होते.
ठाणे जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन (टीडीटीटीए) आणि मुंबई सेंट्रल डिस्ट्रिक्ट टेबल टेनिस असोसिएशन (एमसीडीटीटीए) यांनी मान्यता दिलेल्या या स्पर्धेमुळे ठाणे जिल्हा संघ आणि मुंबई सेंट्रल संघाला राज्य अजिंक्यपद 2024-25 मध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडीचे व्यासपीठ मिळाले.
11 वर्षांखालील, 13 वर्षाखालील, 15 वर्षांखालील, 17 वर्षाखालील, 19 वर्षाखालील, पुरुष, महिला आणि मास्टर्स (39+) अशा विविध वयोगटांमध्ये १३ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभाला यतिन टिपणीस (टीडीटीटीएचे सरचिटणीस), महेंद्र चिपळूणकर (एमसीडीटीटीए व एमएसटीटीएचे सहसचिव), मिनी नायर (श्री माँ विद्यालयाच्या प्रिंसिपल), रमा अनंतरमण (मुख्याध्यापिका, श्री माँ विद्यालय), अकिला श्रीराम (श्री माँ लिलीजचे प्रमुख) आदी मान्यवर उपस्थित होते.
विजेत्यांना चषक, गुणवत्ता प्रमाणपत्र व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलींच्या गटात हृतिका मधुरने अन्वी गुप्तेवर तर 17 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रतीक तुळसाणीने निलय पाटेकरवर विजय मिळवला. 19 वर्षांखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद अन्वी गुप्तेने पटकावले, तर 19 वर्षाखालील मुलांचे विजेतेपद पार्थ मगरने पटकावले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे युट्यूबवर थेट प्रक्षेपण करण्यात आले, ज्यामुळे टेबल टेनिसप्रेमींना घरबसल्या स्पर्धा पाहता आली. पहिल्या 4 स्टार टेबल टेनिस स्पर्धेने आपल्या घवघवीत यशासह भविष्यातील स्पर्धांसाठी एक यशस्वी पायंडा पाडला.
