हस्तांतरण केंद्र हटविण्याचे आवाहन !
ठाणे : शहरात मागील काही दिवसांपासून कचऱ्याची समस्या मोठ्याप्रमाणात वाढू लागली आहे. शहरात कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे बड्या गृहसंकुलातील कचरा पिंपात भरुन ठेवला जात असल्याता प्रकारही उघडकीस आला होता. तर, दुसरीकडे ठाणे शहरातील कचरा गोळा करुन घंटा गाडीने तो कचरा वागळे इस्टेट रस्ता क्रमांक २६ सीपी तलाव परिसरात आणला जात आहे. याठिकाणी कचऱ्याचे संकलन करुन त्याचे वर्गीकरण करण्यात येते. परंतू, मागील काही दिवसांपासून याठिकाणी कचऱ्याचा ढीग वाढला आहे. यामुळे या परिसरात मोठ्याप्रमाणात दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले असल्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहे. याविरोधात नागरिकांनी आवाज उठवला असून येत्या सोमवार पासून यापरिसरात एकाही घंटागाडीला प्रवेश देणार नाही असा इशारा त्यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
नागरिकांपाठोपाठ आता परिसरातील उद्योजकांनी ही महापालिकेला हे हस्तांतरण केंद्र हटविण्यासाठी आवाहन केले आहे. या कचरा हस्तांतरण केंद्रामुळे उद्योगावर परिणाम होत असून अनेक कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच याठिकाणी मोठ्याप्रमाणात माहिती तंत्रज्ञानाच्या कंपन्या आहेत. याठिकाणी मोठ्यासंख्येने कर्मचारी नोकरी निमित्त येत असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत असल्याचे काही उद्योजकांकडून सांगण्यात आले.
कोट
वागळे इस्टेट येथील कचरा हस्तांतरण केंद्रात केवळ ठाणे शहरातीलच नाही तर, कळवा, मुंब्रा आणि इतर भागातूनही कचरा आणला जात आहे. या भागातून कचरा घेऊन येणाऱ्या गाड्याची परिसरात लांबलचक रांग लागत आहे. या गाड्यांमुळे कारखान्यातील मालाच्या गाड्या बाहेर काढता येत नाही याचा त्रास उद्योजकांना मोठ्याप्रमाणात होत आहे. केवळ उद्योजकांनाच नाही तर, या भागात असलेल्या माहिती तंत्रज्ञान कंपन्याच्या बाहेरही कचऱ्याचे ढीग लावले जात आहेत. याचा त्रास याठिकाणी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. त्यामुळे हे हस्तांतरण केंद्र बंद करावे असे आम्ही पालिकेला आवाहन करत आहोत.
एकनाथ सोनावणे, कार्यकारी सचिव, टीसा.