ठाणे : विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी झगडणार्या महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा राज्यस्तरीय मेळावा येत्या शनिवारी ठाण्यात आयोजित करण्यात आला आहे.
सध्या राज्यभरातील महानगर पालिका आणि नगरपालिकांमध्ये कंत्राटी कामगारांचे जाळे पसरले आहे. त्यामुळे सफाई, आरोग्य आदी खात्यांमध्ये भरतीच करण्यात येत नाही. कंत्राटदारांकडून कामगारांची प्रचंड पिळवणूक केली जात आहे. ही पिळवणूक केवळ आर्थिक नसून मानसिक आणि शारीरिकही आहे. ही वेठबिगारी रोखून किमान वेतन आयोगाच्या निर्देशाप्रमाणे वेतन, सुविधा देण्यात याव्यात; कामगारांना सुरक्षेची साधने पुरविण्यात यावीत; कामगारांना त्यांच्या नोकरीची हमी द्यावी; चतुर्थश्रेणी सोबतच तृतीय श्रेणीतील कामगारांनाही वारसा आणि अनुकंपाचे लाभ मिळावेत, आदी मागण्यांवर साधक बाधक चर्चा या मेळाव्यात करण्यात येणार आहे.
शनिवारी सकाळी 11 वाजता महात्मा फुले नगर खुले रंगमंच, खारटन रोड येथे आयोजित या मेळाव्यास राज्यभरातील कामगार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी दिली.
000000