पंचसूत्रीची अंमलबजावणी
ठाणे : पंचसुत्रीच्या संदर्भात पशुपालकांमध्ये जागृती निर्माण करणे तसेच या पंचसुत्रीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने जिल्ह्यात १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘पशुसंवर्धन पंधरवडा-२०२४’ राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त डॉ. वल्लभ जोशी तसेच जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर, यांनी दिली आहे.
१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील सर्व पशुवैद्याकीय संस्थामार्फत पशुधनाचा प्रादूर्भावापासून साथ रोग बचाव होण्याकरिता पशुधनास लाळखुरकुत, सांसर्गिक गर्भपात, लम्पीचर्मरोग, घटसर्प, फऱ्या, पीपीआर, आंत्रविषार इ. रोगांचे लसीकरण तसेच पशुमधील जंत निर्मुलन करण्यासाठी जंतनाशक औषधींचे वाटप, गोचीड गोमाशा निर्मुलनासाठी औषध फवारणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे गाई म्हशींची वंधत्व तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती, पशुधनाच्या सकस आहाराचे महत्त्व तसेच सप्टेंबर २०२४ पासून चालू होणाऱ्या २१ व्या पशुगणनेच्या अनुषंगाने माहिती तसेच मार्गदर्शन करण्यात येत असून याचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधावा. राज्यातील पशुधनाच्या उत्पादक क्षमतेचा पुरेपुर वापर करुन पशुपालनापासून मिळणाऱ्या उत्पन्नाद्वारे राष्ट्रीय सकल उत्पादनात भर टाकण्याची आवश्यकता विचारात घेऊन राज्यात पशुउद्योजकता निर्माण करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग कार्यरत आहे. त्यासाठी विभागाकडून उच्च उत्पादन क्षमता असलेल्या वंशावळीची पैदास, पशुस्वास्थ, पशुखाद्य, पशुचारा व व्यवस्थापन या पंचसुत्रीची अंमलबजावणी करण्यात येत आहेत. राज्यातील सर्व पशुधनास बाबत २७ फेब्रुवारीला शासनाने सूचना निर्गमित केल्या असून जिल्हाधिकारी यांनी ठाणे जिल्ह्यात सर्व जनावरांना टॅगिंग करणे बाबत आदेश दिले आहेत, त्यानुसार अनावधानाने राहिलेले अथवा नवीन जन्म घेतलेली जनावरे यांना सुद्धा पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन tagging करून घ्यावे. ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण तीन तालुका लघुपशु वैद्यकीय, सर्व चिकित्सालय एक, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय एक फिरता पशुवैद्यकीय दवाखाना, श्रेणी १ मधील २२ व श्रेणी २ मधील ४२ असे एकूण ६९ संस्था कार्यरत आहेत.
चौकट
६ ऑगस्ट व ७ ऑगस्ट रोजी कार्यशाळा
पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुधन विकास अभियानांतर्गत उद्योजकता निर्माण करण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यात ६ ऑगस्ट आणि ७ ऑगस्ट या दोन दिवशी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळा ही रोटरी कम्युनिटी क्लब, वडवली, अंबरनाथ या ठिकाणी सकाळी ९:३० वाजता आयोजित केली आहे. या कार्यशाळेमध्ये राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत येणाऱ्या विविध योजनेचे तपशील, बारकावे व योजनेचा अर्ज कसा करावा याविषयी सखोल मार्गदर्शन तज्ञांद्वारे करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये अर्ज प्रक्रिया ज्या लाभार्थ्यांनी पूर्ण केली आहे किंवा जे लाभार्थी यशस्वीरित्या शेळीपालन, कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत त्यांचे स्वः अनुभव व मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये करण्यात येणार आहेत. पशुपालकांनी कार्यशाळेत नोंदणी करण्यासाठी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा तालुक्यातील पंचायत समिती, पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा व नाव नोंदणी करावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.
00000