मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभांतर्गत मंजुषा पाटील यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात हा कार्यक्रम रविवार दिनांक ११ ऑगस्ट २०२४ या दिवशी सायंकाळी पाच वाजता होणार असून तो सर्वांसाठी खुला आहे. यावेळी त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव तर संवादिनीवर सुयोग कुंडलकर साथ देणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क – ०२२-२४३०४१५०.
मंजुषा पाटील ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याच्या गायिका आहेत. त्यांचे संगीताचे शिक्षण वयाच्या बाराव्या वर्षी चिंतुबुवा म्हैसकर यांच्याकडे सांगली येथे सुरू झाले. त्यांनी १९९८ तसेच २००३ मध्ये सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात, बालगंधर्व, भीमसेन महोत्सव, तानसेन समारोह, धारवाड येथील ‘उस्ताद रहमत खॉंसाहेब महोत्सव’ अशा व अनेक इतर संगीत महोत्सवांमध्ये आपली कला सादर केली आहे. तसेच भारतातल्या आणि शिकागो, लंडन, सिंगापूर, मस्कत या देशातही शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले आहेत. त्यांना पंडित जसराज गौरव, माणिक वर्मा, गुरुवर्य बी. एस. उपाध्ये स्मृती, संगीत शिरोमणी, उस्ताद बिस्मिल्ला खान आणि कुमार गंधर्व पुरस्कार मिळाले आहेत.