कल्याण : ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कल्याण तालुक्यातील जांभुळ येथे महसुल पंधरवडा अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, वृक्षारोपण, विविध दाखल्यांचे वाटप या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला आमदार किसन कथोरे त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. घुगे यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत 3 हेक्टर क्षेत्रावर बांबू वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. त्याचप्रमाणे 10 हेक्टर क्षेत्रावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या सहकार्याने सीएसआर निधीच्या माध्यमातून जांभूळ वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. या माध्यमातून शासकीय गुरुचरण जमिनीवर सुमारे 15 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेची त्याचपप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या दोन्ही योजनांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना दिली व या दोन्ही योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याकरिता लोकांना आवाहन केले.
तसेच याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वाटप, आदिवासी महिलांना रेशन कार्डचे वाटप, जन्म दाखला मृत्यू दाखल्यांचे वाटप, बचत गटांना फिरत्या निधीचे वाटप, श्रावण बाळ व संजय गांधी योजनेचा लाभ तसेच विविध आवश्यक दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
०००००
