ठाणे : शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयात मराठी वाड्मय मंडळाचा उद्घाटन सोहळा साजरा करण्यात आला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी वाढवण्यासाठी आनंद विश्व गुरुकुल विद्यालयाने विद्यार्थ्यांना मराठी वाड्.मय मंडळाचे व्यासपीठ खुले करून दिले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने झाली. स्वागत गीताच्या स्वरात अतिथींचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा हर्डीकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर मॅडमनी जीवनाचे वास्तव्य सांगणाऱ्या आपल्या स्वलिखित कवितेचे वाचन केले व विद्यार्थ्यांना लेखनासाठी प्रोत्साहित केले.
संस्थेचे अध्यक्ष विलास ठुसे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी व्यासपीठ खुले असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अनंत जोशी यांचा परिचय आनंद विश्व गुरुकुलच्या उपप्राचार्या दीपिका तलाठी यांनी करून दिला व विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यास उत्तेजन दिले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कवी, कथाकार, लेखक श्री. जोशी यांनी ‘वाचनाने मला काय दिले?’ या विषयावर विविध उदाहरणे देऊन विद्यार्थी वाचन संस्कृतीकडे आकर्षित व्हावीत तसेच वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रसिद्ध लेखकांच्या पुस्तकांची नावे सांगून अशी पुस्तके विद्यार्थ्यांनी जरूर वाचावीत व आपले ज्ञान भंडार वाढवावे असे आवर्जून सांगितले.
विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचावीत असे आवाहन संस्थेचे खजिनदार अक्षर पारसनीस सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रधार योगेश पंडित यांनी मराठी वाड्मय मंडळाच्या वतीने अजूनही कार्यक्रम वर्षभरात करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला पर्यवेक्षक प्राध्यापक सागर जाधव, सर्व शिक्षक आणि मराठी वाड्.मय मंडळाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
0000
