अशोक गायकवाड
रायगड : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पंतप्रधान उज्वला योजना लाभार्थी रायगड जिल्ह्यातील ७० हजार कुटुंबे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी कुटुंबांना तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रायगड सर्जेराव सोनवणे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात घोषित केल्याप्रमाणे राज्यभर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय दि. ३० जुलै २०२४ रोजी जारी झाला आहे. रायगड जिल्ह्यात केंद्र शासनाचे तीनशे रुपयांचे अनुदान मिळणाऱ्या उज्ज्वला योजनेच्या ७० हजार लाभार्थी कुटुंबांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत एका महिन्यात एकाच सिलेंडर साठी शासन अनुदान मिळणार आहे. त्यामध्ये गॅस सिलेंडरची बाजारभावानुसार होणारी अंदाजे ८३० रुपयांची रक्कम तेल कंपन्या ग्राहकांकडून घेतील. त्यानंतर उज्ज्वला योजनेकरीता केंद्र शासनाचे तीनशे रुपये व राज्य शासनाचे पाचशे तीस रुपये असे एकूण ८३० रुपये महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचे कुटुंब देखील या योजनेसाठी पात्र असणार आहे. या योजनेकरीता एका रेशनकार्डवरील एकच महिला पात्र ठरणार असून एक कार्डवर तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेच्या लाभासाठी सदर गॅस जोडणी ही लाभार्थी महिलेच्या नावे असणे आवश्यक आहे. या योजनेच्या लाभार्थीना प्रथम गॅस सिलेंडरची बाजारभावानुसार पूर्ण रक्कम (अंदाजे ८३० रुपये) भरावी लागेल व त्यानंतर सदर सिलेंडरसाठी भरलेली संपूर्ण रक्कम शासन अनुदान स्वरुपात लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
00000
