कंत्राटी कामगारांचे किरण कांबळे यांना आवाहन
ठाणे : ठाणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना वाढीव पगारासह मागील थकबाकी मिळवून देणाऱ्या श्रमजीवी कामगार संघटनेच्या ठाणे महापालिका युनिटचे अध्य्क्ष किरण कांबळे यांना कंत्राटी कामगारांसह इतर चतुर्थ श्रेणी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेत पाठवावे असे भावनिक आवाहन कंत्राटी कामगारांच्या निर्धार मेळाव्यात करण्यात आले. किरण कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालीकेच्या फायलेरिया विभागातील लाभार्थी कंत्राटी कामगारांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.
काहि दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेच्या फायलेरिया विभागातील सुमारे ५५ कंत्राटी कामगारांना ते कार्यरत असलेल्या मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदाराने बेकायदेशीरपणे कामावरून कमी केले होते. याशिवाय दोन महिन्याचा पगार न देणे, जानेवारी २०२० पासून त्यांच्या वार्षिक पगारे रजेचा पगार दिला नव्हता. या अन्यायाविरुद्ध कामगारांनी महापालीकेकडे वेळोवेळी दाद मागितली होती. तरीसुद्धा न्याय न मिळाल्यामुळे या कामगारांनी श्रमजीवी कामगार संघटनेच्या ठाणे महापालिका युनिटचे अध्य्क्ष किरण कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालीकेच्या प्रवेशद्वारासमोर तीन दिवस तीव्र आंदोलन केले होते. एरवी या कामगारांची दखल न घेणाऱ्या ठाणे महापालीकेच्या प्रशासनाने यावेळी ताबडतोब त्यात लक्ष घालत त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या होत्या. त्यामुळे या कामगारांना पगार वाढीसह, दोन वर्षांचा वार्षिक रजेचा पगार मिळाला होता. त्यामुळे किरण कांबळे यांचे आभार मानण्यासाठी फायलेरिया विभागातील कामगारांनी पुढाकार घेत हा निर्धार मेळावा आयोजित केला होता. यावेळी जेष्ठ कामगार नेते जगदीश खैरालिया, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोने आणि इतर कमगारांनी समयोचित भाषणे केली.या निर्धार मेळाव्यास सामाजिक नेते जनार्दन कांबळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
00000
