अशोक गायकवाड

 

अलिबाग : युवक-युवतींना शिक्षणानुरूप रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी राज्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत रायगड जिल्ह्यातील अलिबाग वाघोली येथील चैतन्य अनिल पवार या २८ वर्षीय आदिवासी युवकाची रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. चैतन्य पवार याने शिक्षण स्थापत्य अभियांत्रिकी पदवी पर्यंत झाले असून, गुरुवारी (ता.८) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते त्याला नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध आहे. मात्र युवकांना शिक्षणानंतर अनुभावा अभवी पूर्णवेळ रोजगार मिळण्यात अडचणी निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांना रोजगार मिळविण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अहर्तेप्रमाणे म्हणजे १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ६ हजार, आय.टी.आय., पदविकाधारक विद्यार्थ्यांना ८ हजार तर पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना १० हजार विद्यावेतन दरमहा डीबीटी पद्धतीने देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत शासनाच्या विविध विभागांमध्ये युवकांची नियुक्ती करण्यात येत आहे. इच्छुक युवकांनी शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले असून, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात चैतन्य पवार या आदिवासी युवकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा कौशल्य विकास यंत्रणा सहाय्यक आयुक्त अमिता पवार, जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव उपस्थित होते.
योजनेसाठी आवश्यक पात्रता
उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. उमेदवाराची आधार नोंदणी असावी. उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *