नवी मुंबई : संपूर्ण देशभरात 9 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत राबविण्यात येणा-या ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. यामध्ये विभागाविभागात तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आलेल्या असून त्यामध्ये विद्यार्थी, महिला, युवक, नागरिक मोठ्या संख्यने सहभागी होत आहेत.
अशाच प्रकारचा ई – बाईक आणि सायकलसह इकोफ्रेंडली तिरंगा रॅलीचा एक अभिनव उपक्रम मुख्यालय स्तरावर राबविण्यात आला. यामध्ये 50 हून अधिक नागरिक व स्वच्छताकर्मी यांनी आपल्या सायकल तसेच युलू ई बाईक घेऊन सहभागी होत ‘भारतमाता की जय’ या सोबतच स्वच्छतेच्या अनुषंगाने ‘निश्चय केला, नंबर पहिला’ अशा घोषणा देत ही रॅली यशस्वी केली.
महापालिका मुख्यालय इमारतीपासून नेक्सस मॉलपर्यंत काढण्यात आलेल्या या इकोफ्रेंडली तिरंगा रॅलीत नवी मुंबईतील अनेक सायकलप्रेमी उत्साहाने सहभागी झाले होते. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व क्रीडा आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त श्रीम. अभिलाषा म्हात्रे – पाटील यांनी झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ केला. याप्रसंगी बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल, स्वच्छ नवी मुंबई मिशनच्या महानगरपालिकेच्या वुमेन आयकॉन श्रीम.रिचा समित उपस्थित होत्या.
या इकोफ्रेंडली तिरंगा रॅलीच्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश प्रसारित करण्यासोबतच ई – बाईक, सायकल अशा पर्यावरणपूरक वाहनांचा नागरिकांनी वापर वाढवावा व प्रदूषण रोखून पर्यावरण संरक्षणात आपला हातभार लावावा हा संदेश प्रसारित करण्यात आल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांनी सांगितले. यावेळी सामुहिकरित्या तिरंगा प्रतिज्ञा तसेच स्वच्छतेची शपथ घेऊन रॅलीची यशस्वी सांगता करण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांनी तिरंगा सेल्फी स्टँडवर मोठ्या प्रमाणात सेल्फी छायाचित्रे काढली तसेच घरोघरी तिरंगा कॅनव्हासवर स्वस्वाक्षरी करून अभियानात सहभाग नोंदविला.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *