पालकमंत्र्यांनी स्वतःची जमीन देऊन सोडविला प्रश्न
राज भंडारी
पनवेल :जिल्ह्यातील कातकरी समाजाचा ७० भटक्या कुटुंबाच्या घरांसाठी जागेची समस्या होती. वर्षानुवर्षे त्यांच्या घरांचा प्रश्न प्रलंबित होता. सरकारकडे या समाजातील कुटुंबाना देण्यासाठी जमीन उपलब्ध नव्हती. जेव्हा ही समस्या सिंधुदुर्गनगरी येथील जनता दरबारात मांडण्यात आली त्यावेळी ही समस्या ताबडतोब सोडविण्यात आली. यासाठी आपण स्वतःची ओसरगांव येथील जागा देण्याचा निर्णय घेतला आणि जागा सुद्धा निश्चित करण्यात आली आहे. यामुळे या कातकारी बांधवांना लवकरच हक्काची घरे उपलब्ध होतील, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. जनता दरबारात ८२ अर्ज दाखल झाले होते. पैकी ७४ अर्जाचे निरसन झाल्याचे त्यांनी सांगितले.
स्वतःची जमीन देण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे या सर्व कुटुंबांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मनापासून आभार मानले आणि असा नेता किंवा मंत्री आम्ही कधीच पाहिला नाही. वर्षानुवर्षे आम्ही भटकत होतो पण आता आम्हाला हक्काचा निवारा मिळाला आणि आता आमच्या सर्व पिढ्या हक्काच्या घरात राहतील त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे , अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.
सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जनता दरबार झाला. या कार्यक्रमात मंत्री रवींद्र चव्हाण बोलत होते. या प्रसंगी रवींद्र चव्हाण यांच्या सोबत भाजप आमदर नीतेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छींद्र सुकटे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावळे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आ. अजित गोगट आदींसह खाते प्रमुख तसेच कणकवली विधानसभा मतदारसंघातील सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.
जनता दरबार हा प्रसिद्धीसाठी नाही. या पूर्वी सुद्धा जिल्ह्यात असे जनता दरबार होत होते. आज झालेल्या जनता दरबारात ८२ अर्ज दाखल झाले होते. पैकी ७४ अर्जाचे निरसन झाले आहे. सर्वसामान्यांचे तक्रारीचे निरसन होणे हेच खरे या जनता दरबाराचे यश आहे, असे प्रत्युत्तर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आमदर वैभव नाईक यांच्या टीकेला दिले. आमदर नाईक यांनी पालकमंत्र्याचा जनता दरबार हा निवडणुकांसाठी फार्स असल्याची टीका केली होती.
सार्वजनिक बांधकाम हायवे आणि पाटबंधारे विभागातील सर्व ९ अर्जाचे निरसन केले असून पोलीस प्रशासनाचे दोन्ही अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. ग्रामविकास विभागाअंतर्गत सर्व १६ अर्जाची पूर्तता झाली असून कृषी व आरोग्य विभाग ५, मध्यम पाटबंधारे आणि नियोजन विभाग ३, समाज कल्याण विभाग २, नगर विकास खारभूमी विभाग ६ असे विभागनिहाय अर्ज निकाली काढल्याचे मंत्री चव्हाण म्हणाले. उर्वरित अर्जावर लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९ हजार ८५९ युवक – युवतींना रोजगार देण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत १ हजार उमेदवारांना विविध विभागात रोजगार देण्यात आला आहे. उर्वरीत उमेदवारांना रोजगार देण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाकडील रोजगार विषयक उपक्रमांची माहिती द्यावी, असे निर्देश ना. चव्हाण यांनी दिले. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत गाव पातळीवर घराघरात पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचविण्यात येत आहे. जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे सुरू आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत जिल्हयात आतापर्यंत १ लाख ५० हजार ३८३ अर्ज प्राप्त झाले असून त्यातील १ लाख ४४ हजार ८७४ अर्ज पात्र ठरले आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेनुसार सोमवारी कणकवली मतदारसंघातील कणकवली, देवगड व वैभववाडी या तालुक्यातील नागरिकांसाठी सिंधुदुर्गनगरी येथे जनता दरबार झाला. तसेच मंगळवारी कुडाळ – मालवण मतदारसंघातील नागरिकांसाठी आणि बुधवारी सावंतवाडी मतदारसंघातील सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यातील नागरिकांसाठी याच ठिकाणी जनता दरबार संपन्न झाला. या सर्व जनता दरबाराला मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळाला.
