अनिल ठाणेकर
ठाणे : शहरात सुमारे १०० एकर जमिनीचा घोटाळा झाला आहे. शंभर एकरची वन जमीन अवघ्या ३१ कोटींमध्ये विकण्यात आली असून त्यामध्ये अधिकारी, एका ट्रस्टचा ट्रस्टी आणि बिल्डर यांचा सहभाग आहे. या संदर्भात आपण न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी एक्स पोस्टमधील ट्विटमध्ये म्हटले आहे. यामुळे ठाण्यात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून ठाण्यात झालेल्या वनजमिनीचा घोटाळा उघडकीस आणण्याचे सूचक विधान केले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ठाण्यामध्ये येत्या काही दिवसांतच एक मोठा स्कॅम उघडकीस येणार आहे.महाराष्ट्र राखीव वने असलेली जमीन एका मोठ्या ट्रस्टच्या मुख्य ट्रस्टीने विकण्याचे कारस्थान केले आहे आणि त्यामध्ये सगळे अधिकारीही सामील झालेले आहेत. ३१ कोटी रूपयांमध्ये ही जमीन विकण्यात आलेली आहे. पण, राखीव वने विकण्याचा अधिकार कोणाला आहे? त्यास परवानगी देण्याचा अधिकार कोणाला आहे? अन् यामध्ये ट्रस्टी, परवानगी देणारे, विकत घेणारे या सर्वांनी मिळून हा घोटाळा केला आहे. हा घोटाळा लवकरच संपूर्ण कागदपत्रांसह कायदेशीररित्या उघड केला जाईल आणि याबाबत उच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल करण्यात येईल. जवळपास १०० एकर पेक्षा अधिक ही जमीन असून या ट्रस्टचे अनेक फ्रॉड पोलिसांनी पकडलेले आहेत. ही जमीन कोणाची असेल, हे त्या बिल्डरला हे ट्वीट वाचल्या-वाचल्या लगेच समजेल !” जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नसले तरी या घोटाळ्यात कोण सहभागी असावे, कोणता ट्रस्ट याची चर्चा रंगली आहे.
000000
