अशोक गायकवाड
रायगड : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्हयामध्ये २८ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती न्यायाधिश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग अमोल अ. शिंदे यांनी दिली आहे.
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्हयातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी अपिले, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रलंबित प्रकरणे, तसेच ग्रामपंचायत यांच्याकडील घरपट्टी, पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूरसंचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येतात. २८ सप्टेंबरला होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग ए.एस. राजंदेकर यांनी केले आहे