Month: August 2024

जिजामातानगर गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सुशील साळसकर यांची निवड

मुंबई : जिजामातानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची   सन २०२४ -सन २०२५ ची कार्यकारिणीची निवड जाहिर करण्यात आली असून मंडळाच्या अध्यक्षपदी सुशील मनोज साळसकर यांची तर सरचिटणीसपदी मंगेश घेगडे यांची निवड करण्यात आली. जिजामातानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे  कामगार विभागातील प्रख्यात मंडळ असून या मंडळ आजवर धार्मिक तसेच राष्ट्रीय व विविध सामाजिक  विषयांवर आधारित देखावे सादर करून समाजप्रबोधनाचे  कार्य करण्यासाठी सुपरिचीत आहे. भूकंप , पूर यासारख्या  नैसर्गिक आपत्ती प्रसंगी मदतनिधी देऊन आपल्यापरीने खारीचा वाटा उचलून आपले सामाजिक दायित्व बजावण्याचं कामही हे मंडळ  करीत असते. यंदा मंडळाचे हे ७३ वे वर्ष असून मंडळाची ७२वी वार्षिक सभा मंडळाचे विश्वस्त महेश पावसकर,प्रशांत सुर्वे,राजू नाईक यांंच्या उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली. या सभेत सन २०२४ ते सन २०२५ या वर्षासाठी कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली.कार्यकारी मंडळ पुढीलप्रमाणे.अध्यक्ष- सुशील मनोज साळसकर  कार्याध्यक्ष – सुनिल जुवळे. उप कार्याध्यक्ष – ऋषिकेश खोत, कल्पेश नागे, अक्षय गोसावी. उपाध्यक्ष -राहूल कदम,वैभव गवस,अभिनय राणे. सरचिटणीस- मंगेश घेगडे  चिटणीस- शुभम घाटगे,सिद्धार्थ कदम,अभिषेक नलावडे. खजिनदार- संदीप मेंगडे.हिशोब तपासणीस- राकेश खानविलकर.

श्रीकांत शिंदे आणि आशिष शेलार यांनी फोडली विधानसभा निवडणुकीच्या विजयाची हंडी

मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि आमदार यांनी विजयाची हंडी फोडत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विजयाचा एल्गार पुकारला. निमित्त होते राहुल नारायण कनल आणि जश वीरा यांच्या…

आज डोंबिवलीतील वर्दळीचे रस्ते वाहतुकीसाठी बंद

डोंबिवली : डोंबिवलीतील राजकीय दहीहंड्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर बांधण्यात येतात. या कालावधीत रस्त्यांवर वाहन कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या आदेशावरून मंगळवारी कृष्ण अष्टमीच्या दिवशी दहीहंडी उत्सव असलेल्या रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी रस्ते मार्गावरून वळविण्यात आली आहे. डोंबिवली पूर्व भागातील बाजीप्रभू चौकात भाजपतर्फे दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. सर्वाधिक वर्दळीचा फडके रस्ता आणि रेल्वे स्थानक भागाशी निगडित हा चौक आहे. या चौकात मंगळवारी वाहन कोंडी होऊ नये म्हणून फडके रस्त्याने बाजीप्रूभ चौक भागात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना फडके रस्त्यावरील महावितरण कार्यालय आणि कुळकर्णी ब्रदर्स येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही सर्व वाहने फडके रस्त्यावरून डावे वळण घेऊन अंबिका हॉटेल, के. बी. विरा शाळेवरून पी. पी. चेंबर्स मॉल किंवा पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावरून इच्छित स्थळी जातील. मानपाडा रस्त्यावरील चार रस्ता पाटणकर चौक येथे फडके वॉच दुकानाच्या बाजुला मनसेतर्फे दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद रस्त्याने जोधपूर स्वीट ते गिरनार चौक भागातून चार रस्ता भागात येणाऱ्या वाहनांना अडथळा होणार आहे. त्यामुळे टंडन रस्त्याने, दत्तनगर भागातून राजेंद्र प्रसाद रस्त्याने चार रस्ता पाटणकर चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना गिरनार चौक येथे प्रवेश बंद केला जाणार आहे. ही वाहने लेवा भवन सभागृह येथील छेद रस्त्याने किंवा दत्तनगर चौकातील टिपटॉप कॉर्नर म्हाळगी चौकातून दत्तनगर चौकातून, संगीतावाडी, प्रगती महाविद्यालय दिशेने इच्छित स्थळी जातील. मानपाडा रस्ता, टिळक चौकाकडून चार रस्त्यावरून दत्तनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पाटणकर चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने संत नामदेव पथ, मानपाडा रस्ता, ग्रीन चौक, चिपळूणकर मार्गे इच्छित स्थळी जातील. डोंबिवली पश्चिमेत माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे फाऊंडेशनतर्फे पंडित दिनदयाळ रस्त्यावरील सम्राट चौकात दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवासाठी डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाकडून दिनदयाळ रस्त्याने सम्राट चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दिनदयाळ रस्त्यावरील गणपती मंदिर येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने गणपती मंदिराजवळ डावे वळण घेऊन जी. एन. गॅरेज, येलोरा सोसायटीकडून सम्राट हॉटेल चौकाकडून रेतीबंदर, माणकोली पूल दिशेने जातील. रेतीबंदर, जुनी डोंबिवली, मोठागाव, देवीचापाडा भागातून सम्राट चौकाकडे येणाऱ्या वाहनांना सम्राट चौक व्यंकटेश सोसायटी येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने सम्राट चौकात डावे वळण घेऊन नाना शंकरशेठ मार्गे घनश्याम गुप्ते रस्ता किंवा महात्मा फुले रस्ता मार्गे इच्छित स्थळी जातील. अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना या प्रवेश बंदीमधून मुक्तता आहे. माणकोली पूल दिशेने जाणारी वाहने दिनदयाळ रस्त्यावरून धावतात. त्यामुळे रेतीबंदर चौक, गुप्ते रस्ता, सम्राट चौक भागात अभूतपूर्व वाहन कोंडी होण्याची शक्यता प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. या तिन्ही ठिकाणी पुरेसा वाहतूक पोलीस, पोलीस बंदोबस्त ठेवण्याची प्रवाशांची मागणी आहे.

मानाच्या समजल्या जाणाऱ्या टेंभीनाका हंडीकरिता, गोविंदा पथकांसाठी प्रत्येकी  १ लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक

अनिल ठाणेकर ठाणे : धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवले. तोच उत्साह, तीच तरुणाईची धुम, थरांचा थरार आणि गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, मान्यवरांची मांदियाळी, गीत संगीतासह भगव्याचा जल्लोष यंदा मंगळवार  २७ ऑगस्ट २०२४ रोजी टेंभीनाक्यावर पहायला मिळणार असून हा दिमाखदार सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे. मुंबईचा जल्लोष आणि उत्साह ठाण्यात आणण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी टेंभीनाक्यावरची हंडी मोठ्या जल्लोषात साजरी करण्याचा चंग बांधला. दिघेसाहेबानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा कायम ठेवत या महोत्सवाला वेगळे वलय निर्माण करुन दिले.  टेंभीनाक्यावरच्या  हंडीत बक्षीसांबरोबरच त्याच दिवशी जाहीर केलेली बक्षीसे रोख स्वरुपात देण्यात येऊ लागली. खास मराठमोळा साज दिमाखदार सोहळा व आकर्षक बक्षीसे यामुळे ठाण्यातील ही परंपरा असलेली हंडी ठाण्याची मानाची हंडी म्हणून ओळखली जात आहे. हा दिमाखदार सोहळा साजरा करताना ठाणे व मुंबईतील गोविंदा पथकांकरीता प्रत्येकी रोख बक्षीस व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. या हंडीसाठी जाहीर करण्यात आलेले बक्षीस हे मानवीशक्ती असलेल्या थरांकरीता आहे. दहीहंडी हा पारंपारिक उत्सव असला तरी तो एक साहसी खेळ आहे. या दहीहंडी महोत्सवात मुंबई व ठाण्यातील गोविंदासाठी वेगवेगळी हंडी लावण्यात येणार आहे. मुंबईतील गोविंदा पथकासाठी व ठाण्यातील गोविंदा पथकासाठी प्रत्येकी १ लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. महिला गोविंदा पथकासाठी १,००,०००/- रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तर सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी १२,००० हजार, सहा थरांसाठी ८,००० हजार, पाच थरांसाठी ६,००० हजार तर चार थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी ५००० हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. दहीहंडी फोडणान्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी रॅपलिंगसाठी असणारे दोरखंड वापरण्यात येणार असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख  ,खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे .या दहीहंडी उत्सवात नामवंत गायक तसेच चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांचा नृत्य व संगीतमय जल्लोष असणार आहे. तसेच सुप्रसिध्द मराठी व हिंदी चित्रपट व मालिकांमधील प्रसिद्ध नायक/नायिका उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या लोककलेचा नृत्याविष्कार सुप्रसिध्द लावणी सम्राज्ञी आपल्या आकर्षक नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन तसेच या उत्सवात आपल्या सुमधूर व जल्लोषमय गाण्यांनी येणाऱ्या गोविंदांना बेधुंद करणार आहेत. त्याचबरोबर उत्तम असा साउंड तसेच नेत्रदिपक रोषणाई या कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहे. हा दहीहंडी महोत्सव यशस्वी करण्याकरिता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, हेमंत पवार (शिवसेना ठाणे शहर विधानसभा  प्रमुख ,टेंभीनाका मित्रमंडळाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे विभाग प्रमुख कमलेश चव्हाण आदी विशेष प्रयत्न करीत असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख ,खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केले आहे.

ठाणे – बोरिवली भुयारी मार्गाच्या कामात ठाणे महापालिकेचे सर्वतोपरी सहकार्य – सौरभ राव

ठाणे :  ठाणे आणि बोरिवली मधील प्रवासाचे अंतर अवघ्या १२ मिनिटांवर आणण्याची क्षमता असलेल्या ठाणे – बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पातील ठाणे महापालिकेकडील विषयांचा आढावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकताच घेतला. ठाणे – बोरिवली भुयारी मार्गाचे काम एमएमआरडीए करीत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले असून याचा बहुतांश भाग हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील भूसंपादन, अतिक्रमणे हटविणे, वृक्ष प्राधिकरणाकडून आवश्यक परवानगी आदी ठाणे महापालिकेशी निगडीत विषय एमएमआरडीए आणि बांधकाम कंपनीच्या प्रतिनिधींनी आयुक्त सौरभ राव यांच्या समोर मांडले. या बैठकीस, अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, सहायक संचालक, नगर रचना संग्राम कानडे, उपायुक्त (उद्यान) मनोहर बोडके, उपनगर अभियंता विकास ढोले आदी उपस्थित होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधकाम स्थळी भेट देवून पाहणी केलेली आहे. त्यानुसार, परवानगीबद्दलचे विषय मार्गी लागतील. जलवाहिनी स्थलांतर, उद्यानासाठी वेगळा प्रवेश मार्ग आदी बाबींबाबत एकत्रित पाहणी करून लगेच निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त राव यांनी या बैठकीत स्पष्ट केले. भुयारी मार्गाच्या बांधकामासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर पाणी लागणार आहे. त्यासाठी ठाणे महापालिकेच्या एसटीपीमधील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्याची सूचना आयुक्त राव यांनी केली. त्यासंदर्भात, महापालिकेच्या बांधकाम विभागाशी समन्वय साधून पाण्याचे नियोजन करण्याची ग्वाही देण्यात आली.

बेलापूर व वाशी विभागात अतिक्रमण विरोधी धडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकमांविरोधात  आयुक्त डॉ. कैलास  शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने बेलापूर विभागात अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले. ए विभाग बेलापूर कार्यालयांतर्गत प्लॉट नंबर 62,63 व  64   सेक्टर 15 ,सन सिटी बंगला  येथे नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे पहिल्या मजल्यावर व  दुसऱ्या मजल्यावर  पत्राशेड उभारून जागा  बंदिस्त करण्यात आले होते . सदर बांधकामास नवी मुंबई बेलापूर कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 54  अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. त्यानुसार संबंधितांनी केलेले बांधकाम स्वतः हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम तसेच ठेवले होते. सदर बांधकाम सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांचे नियंत्रणाखाली तोडक मोहिमेचे आयोजन करून सदरचे पत्रा शेड हटविण्यात आले. त्याचप्रमाणे तसेच सी विभाग कार्यक्षेत्रात हॉटेल गोल्डन सूट व हॉटेल त्रेनजा सेक्टर 17 वाशी येथे महानगरपलिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे लॉजिंग हॉटेल व स्पा तयार केले होते. सदर बांधकामास वाशी विभाग कार्यालयाने महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 54 अन्वये नोटीस देण्यात आली होती.संबंधितांनी केलेले बांधकाम स्वतः हून हटविणे आवश्यक होते. परंतु सदर बांधकाम स्वतः हून न हटविल्याने वाशी विभाग कार्यालयाने तोडक मोहिमेचे आयोजन करून सदर बांधकाम अंशतः निष्कासित करण्यात आले. बेलापूर मोहिमेसाठी बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त शशिकांत तांडेल, कनिष्ठ अभियंता मयुरेश पवार इ. अधिकारी व कर्मचारी, वाशी विभागासाठी सहाय्यक आयुक्त श्री.सागर मोरे, अतिक्रमण विभागाचे पोलिस पथक तैनात होते. यापुढे देखील अशीच कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

२८ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन – न्या. अमोल शिंदे

अशोक गायकवाड रायगड : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्हयामध्ये २८ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती न्यायाधिश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग अमोल अ. शिंदे यांनी दिली आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्हयातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी अपिले, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रलंबित प्रकरणे, तसेच ग्रामपंचायत यांच्याकडील घरपट्टी, पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूरसंचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येतात. २८ सप्टेंबरला होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग ए.एस. राजंदेकर यांनी केले आहे

दहीहंडी बक्षीसाची रक्कम रुग्णांच्या मदतीसाठी

रमेश औताडे मुंबई : दहीहंडी उत्सव एक इव्हेंट झाला आहे. लाखो रुपये खर्च होत आहेत. मात्र हे लाखो रुपये गोरगरीब रुग्णांच्या उपयोगी आले तर ? हा विचार घेऊन दहीहंडी कार्यक्रमाचे अडीच लाख रुपये गोरगरीब रुग्णांच्या उपयोगी आणण्यात येणार आहेत. समाजसेवक तसेच धगधगती मुंबईचे संपादक भिमराव धुळप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपविभागप्रमुख यशवंत विचले यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातील दहीहंडीच्या पथकाची संख्या १०० वरून २५ करत शिल्लक ७५ पथकाची बक्षीस रक्कम गरीब रुग्णांना देण्यात येणार आहे. अडीच लाख रुपये असणारी ही रक्कम थोडी वाटत असली तरी एक नवा पायंडा आम्ही पाडत आहोत असे सांगत धुळप म्हणाले, असे जर सर्वच दहीहंडी आयोजकांनी केले तर एक चांगले समाज उपयोगी कार्य होईल. २७ ऑगस्ट रोजी मुंबईतील दादर मध्ये केशवराव दाते मैदान येथे दहीकाला उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

मासेमारी बोटीचा पंखा तुटून पडल्याने समुद्रात बोट पडली बंद

१८ जण अडकले मीरारोड: भाईंदरच्या उत्तन पातान बंदर येथील गॉडवील या मच्छीमार बोटीचा पंखा समुद्रात तुटून पडल्याने बोट भरवादळात समुद्रात बंद पडली आहे. बोटीवर नाखवा व १७ खलाशी असे १८ जण अडकले असून त्यांना मदतीसाठी कोस्टगार्ड , पोलीस, मत्स्य विभाग सह मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना मच्छीमार संस्थेने कळवले आहे. भाईंदरच्या उत्तन पातान बंदर येथील गॉडवील ह्या मच्छीमार बोटीचे नाखवा अलेकझांडर डग्लस बेळू व इतर १७ जण हे मासेमारीसाठी खोल समुद्रात गेले होते. परंतु गेल्या दोन दिवसां पासून मुसळधार पाऊस व वादळीवारे सुरु झाल्याने मच्छीमार बोटींना किनाऱ्यावर परतण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने मासेमारीसाठी गेलेल्या बोटी परतू लागल्या आहेत. अलेक्झांडर हे देखील किनाऱ्यावर परतण्यासाठी निघाले होते. परंतु त्यांचा बोटीचा पंखा अर्थात  प्रोपेलर तुटून पाण्यात पडल्याने बोट चालू शकत नाही. बोट समुद्रात हेलकावे खात असून त्यावरील सर्व १८ जण अडकून पडले आहेत. सदर बोट भर समुद्रात बंद पडून १८ जण अडकल्याची माहिती  रविवारी सकाळी ७ च्या सुमारास वायरलेस वरून मिळाल्यावर मदतीसाठी कोस्टगार्ड, पोलीस, मत्स्य विभागासह मासेमारीसाठी गेलेल्या बोटींच्या नाखवा यांना कळवले आहे, असे मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांनी सांगितले. कोस्ट गार्ड कडून मदत पाठवतो असे आश्वासन मिळाले आहे. बंद पडलेल्या बोटीशी वायरलेसद्वारे संपर्क होत असला तरी हवामान ठीक नसल्याने व्यत्यय येत आहे असे ते म्हणाले.