Month: August 2024

मोरबे धरण काठोकाठ भरण्याच्या उंबरठ्यावर

नवी मुंबई : शहराला जलसमृद्धता बहाल करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाची पाणी साठवण क्षमता 190.890  द.ल.घ.मी. इतकी असून, विसर्ग पाणी पातळी तलांक 88.00 मी. इतकी  आहे. 25 ऑगस्ट  दुपारी  1:00 वाजेपर्यंत मोरबे धरणात  185.151  द.ल.घ.मी.…

आदिवासींसाठी विविध दाखले वाटप शिबिरांचे आयोजन – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : जिल्ह्यातील आदिवासी जमातीच्या व्यक्तींना प्रत्येक गावांमध्ये व वाडयांमध्ये जाऊन जातीचे दाखले, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्ड, आधारकार्ड, जनधन खाते, इतर आवश्यक प्रमाणपत्रे व पीएम किसानचा लाभ देण्याकरिता २३ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीमध्ये शिबीरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. आदिम जमातीच्या (कातकरी) विकासाकरिता प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियान (PM- JANMAN) ही मोहिम देशभरात राबविण्यात येत आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्राधान्यक्रमात आहे. या योजनेच्या अंमलबजावणीकरीता केंद्र शासनाने ११ प्राथम्य क्षेत्र निश्चित केले असून त्यामध्ये ९ मंत्रालयाचा समावेश केला आहे. या कार्यक्रमांतर्गत आदिम जमातीच्या लोकांना जातीचे दाखले, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्ड, आधारकार्ड, जनधन खाते, इतर प्रमाणपत्रे व पीएम किसान चा लाभ देण्यात येणार आहे.प्रकल्प अधिकारी,आदिवासी विकास प्रकल्प पेण, जिल्हा आरोग्य अधिकारी, रा.जि.प., तहसिलदार सर्व, गट विकास अधिकारी-पंचायत समिती सर्व, तालुका कृषी अधिकारी सर्व व अग्रणी बँक व्यवस्थापक यांचा या शिबिरात समावेश असणार आहे. जातीचे दाखला, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्ड, आधारकार्ड, जनधन बचत खाते, पीएम किसानचा लाभ यापासून एकही आदिम व्यक्ती वंचित रहाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाचे महाराष्ट्र सरकारला महत्वपूर्ण आदेश !

मॅन्युअल स्कॅवेंजिंग संदर्भात ठाणे : मॅन्युअल स्कॅवेंजिंग विरूद्ध कायद्याअंतर्गत मॅन्युअल स्कॅवेंजिंग च्या घटना कळवण्यासाठी या विषयावरील जिल्हा समितींचे आणि दक्षता समितींचे वेगळे ईमेल पत्ते आणि सोशल मीडिया हँडल्स लगेच म्हणजे…

तातडीने राष्ट्रीय पातळीवर जादूटोणा विरोधी कायदा करावा!

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख यांची भूमिका अनिल ठाणेकर ठाणे : गुजरात विधानसभेने एकमताने ‘नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि जादूटोणा (काळी जादू) अधिनियम (२०२४)’ हे विधेयक पास केले आहे. या अधिनियमाचा मसूदा गुजरात राज्याचे गृह राज्य मंत्री हर्ष संघवी यानी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सादर केला. भाजप या सत्ताधारी पक्षासह प्रमुख विरोधी पक्ष, काँग्रेस पक्षाने या अधिनियमास संपूर्णपणे मान्यता दिली. गुजरात मध्ये नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात पारित केलेला जादूटोणा विरोधी कायदा ही स्वागतार्ह बाब आहे. महाराष्ट्रात सातत्याने जादूटोणा विरोधी कायद्याला विरोध करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या गुजरात मधील सरकारने सरकारने उशिराने का होईना हा कायदा करणे हे स्वागतार्ह पाऊल आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र शासनाने २०१३ साली केलेल्या जादूटोणाविरोधी कायद्यातील अनेक तरतुदी या काल गुजरात सरकारने केलेल्या कायद्यामध्ये समाविष्ट आहेत. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही ही भारतातील प्रमुख राज्यांच्या मध्ये आता जादूटोणा विरोधी कायदा असल्याने राष्ट्रीय पातळीवर असा कायदा करायला आता कोणतीच अडचण येवू नये. सर्व पक्षांनी याबाबत या बाबतीत तातडीने सहमती करून राष्ट्रीय पातळीवर देखील जादूटोणा विरोधी कायदा पारित करावा. अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत डॉ. हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख यांनी केली आहे. राष्ट्रीय पातळीवर असा कायदा करताना हा कायदा अजून व्यापक करावा अशी देखील मागणी करण्यात आली आहे. केवळ कायदा करून थांबण्यापेक्षा या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या साठी गुजरात सरकारने प्रयत्न करावेत अशी भूमिका या पत्रकात मांडली आहे. कुठलाही कायदा झाल्यावर पहिल्या महिन्यात त्या कायद्याचे नियम करणे अभिप्रेत असते असे असताना महाराष्ट्र शासनाने विविध पक्षांची सरकारे येवून गेली तरी अजून या कायद्याचे नियम बनवलेले नाहीत. गुजरात राज्याने तरी तातडीने हे नियम बनवून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी  महाराष्ट्र शासनाने प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये ‘जादूटोणा विरोधी कक्ष’ स्थापन करण्याची घोषणा करून महिना उलटला तरी प्रत्यक्षात कुठेही त्याची कार्यवाही झालेली नाही. अंधश्रद्धा निर्मुनल समितीच्या कार्यकर्त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृती दिनाला राज्यातील तीस पेक्षा अधिक पोलीस स्टेशन मध्ये हा कक्ष तातडीने स्थापण्याची मागणी केली आहे. तरी अजून त्या वर कार्यवाही झालेली नाही, या विधेयकामागील भूमिका मांडताना गुजरात सरकारचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी म्हटले आहे की, नरबळी आणि काळ्या जादूच्या दुष्टप्रथेमुळे सामान्य लोकांचे शोषण होण्याच्या चिंताजनक घटना समोर आल्या आहेत. काळी जादू आणि त्यातून होणाऱ्या फसवणुकीला बळी पडण्यापासून सामान्य लोकांना वाचवण्यासाठी हा कायदा करण्यात येत आहे. हा कायदा गैरफायदा घेणाऱ्या स्वयंघोषित बुवांसाठी आहे. या बुवा-बाबामुळे गरीब लोकांच्या अडचणीत वाढ होते. केवळ त्यांच्या कुटुंबाची आर्थिक हानीच नव्हे तर त्यांचा जीवही जातो. हा कायदा अशा लोकांचे जीव वाचवण्यासाठी आहे. राज्यमंत्री हर्ष संघवी पुढे म्हणाले की, बुवाबाबांच्या समाजविघातक आणि हानिकारक कृतींमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. वैज्ञानिक वैद्यकीय उपाय आणि उपचारावरील विश्वासाला गंभीरपणे हानी पोहोचण्याचा धोका आहे, अधिनियमात बंदी घातलेल्या अंधश्रद्धा : १)एखाद्या व्यक्तीला दोरीने किंवा साखळीने बांधून मारहाण करणे, काठीने किंवा चाबकाने मारहाण करणे,  पादत्राणे भिजवलेले पाणी प्यायला लावणे, मिरचीचा धूर देणे, , दोरीने किंवा केसांनी छताला लटकावणे किंवा केस उपटणे, अवयवांना किंवा शरीराला तापलेल्या वस्तूला स्पर्श करून वेदना देणे, उघड्यावर लैंगिक कृत्य करण्यास भाग पाडणे, भूत आणि डाकीण बाहेर काढण्याच्या बहाण्याने लघवी किंवा मानवी मलमूत्र जबरदस्तीने तोंडात टाकणे. २) एखाद्या व्यक्तीद्वारे तथाकथित चमत्कारांचे प्रदर्शन आणि त्याद्वारे पैसे कमविणे; तथाकथित चमत्कारांचा प्रचार आणि प्रसार करून लोकांना फसवणे, आणि दहशत माजवणे. ३)भूत, डाकीण किंवा मंत्राची  धमकी देऊन दहशत निर्माण करणे, शारीरिक दुखापत करून वैद्यकीय उपचार घेण्यापासून प्रतिबंधित करणे, आणि त्याऐवजी अमानुष, दुष्ट आणि अघोरी कृत्ये किंवा उपचार करण्याकडे वळवणे,  इंद्रियांद्वारे अगम्य शक्तीचा भूत किंवा क्रोध आहे असा आभास निर्माण करणे; एखाद्या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देणे किंवा काळी जादू किंवा अमानुष कृत्य करण्याचा सराव करून किंवा प्रवृत्त करून शारीरिक वेदना किंवा आर्थिक हानी पोहोचवणे. ४) कुत्रा, साप किंवा विंचू चावल्यास किंवा इतर आजारात एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार करून घेण्यास मनाई करणे, त्याऐवजी मंत्र-तंत्र किंवा इतर गोष्टी देऊन उपचार करणे. ५) बोटांनी शस्त्रक्रिया करण्याचा किंवा गर्भातील गर्भाचे लिंग बदलण्याचा दावा करणे. ६) गर्भधारणा करण्यास असमर्थ असलेल्या स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवणे, तिला अलौकिक शक्तीद्वारे मातृत्वाची खात्री देणे. या कायद्याचे  उल्लंघन केल्यास सहा महिने ते सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आणि पाच हजार ते पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद या विधेयकात आहे. प्रस्तावित कायद्यांतर्गत राज्य सरकारला पोलिस ठाण्यांसाठी दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्यांना शोधणे आणि प्रतिबंध करणे हे दक्षता अधिकाऱ्याचे कर्तव्य असेल. ०००००

झुंडशाही , दबावाला बळी पडू नका  – न्या. अभय ओक

अलिबाग :  घटनेने दिलेले सर्वसामान्यांचे स्वातंत्र्य  आबाधीत राखणे ही  न्यायव्यवस्थेत काम करणार्‍या वकीलांची व न्याधीशांची जबाबदारी आहे. त्यामुळे या व्यवस्थेत काम करणार्‍यांनी  झुंडशाही , व कोणत्याही दबावाला बळी नपडता निपक्षपातीपणे काम केले पाहिजे,  असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अभय ओक यांनी व्यक्त कले. रायगड जिल्हा आणि अलिबाग बार असोसिएशन यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अभय ओक यांचे ‘ जिल्हा व तालुका न्यायालयांचे न्याय व्यवस्थेतील महत्व ‘  या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शनिवारी (दि.24) क्षात्रैक्य सभागृह , कुरूळ येथे हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती आर. आय. छागला, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एम. एम. साठ्ये, रायगडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर , बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. उदय वारूंजीकर, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य अ‍ॅड. गजानन चव्हाण, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य अ‍ॅड. विठ्ठल कोंडे – देशमुख, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य जयंत जायभावे , जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. संतोष पवार आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. जिल्हा व तालुका न्यायालयात सर्वसामान्य माणसे येत असतात. त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम ही न्यायालये करत असतात. त्यामुळे आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेत ही न्यायालये महत्वाची आहेत. त्यांना दुय्यम न्यायालये असे संबोधणे चुकीचे आहे. असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अभय ओक यांनी केले. जिल्हा व तालुका न्यायालय ही सर्वसामान्यांची न्यायालये आहेत. त्यांच्यासाठी ही शेवटची न्यायालये असतात. ते या पुढील न्यायालयात जावू शकत नाहीत. याच न्यायालयांमध्ये अशीलाचे भवितव्य घडते किंवा बिघडते. त्यामुळे येथेच व्यवस्थित पुरावे नोंदवून आपल्या अशीलाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न वकिलांनी केला पाहिजे, असे न्यायमुर्ती अभय ओक म्हणाले. जिल्हा व तालुका न्यायालयात काम करणार्‍या वकीलांनी आपणास कमी समजू नये. सर्वोच्च  व उच्च न्यायालयात काम करणार्‍या वकीलांपेक्षा आपले ज्ञान  कमी आहे असे समजू नये .  त्यांनी आपल्यातील न्यूनगंड काढून टाकून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा., असे ते म्हणाले. सर्वसामान्यांच्या अपेक्षा न्यायालयांकडून पूर्ण होत नसल्यामुळे न्यायालयाबाबत सर्वसामान्यांच्या मनामध्ये लौकिक कमी होत चालला आहे. न्यायालयाच्या   विश्वासार्हतेला तडा जात आहे. न्यायदानात उशीर होत असल्यामुळे न्यायालयाची बदनामी होत आहे.  त्यामुळे न्यायालयाची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न करा. वेळ पाळा. न्यायालयाचा वेळ वाया घालवू नका, असा सल्ला न्यायमुर्ती अभय ओक यांनी तरूण वकीलांना दिला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एम. एम. साठ्ये म्हणाले की, न्यायालयात आपल्या अशीलाला निकाल मिळणार की न्याय मिळणार याचा विचार करा. माहिती मिळवा. ज्ञानाच्या बळावर शहाणपण कमवा. त्यातून आपली प्रगती करावी. अ‍ॅड. उदय वारूंजीकर, अ‍ॅड. गजानन चव्हाण , अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. रायगड जिल्हा आणि अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रसाद पाटील यांनी प्रस्ताविक केले. सचिव अ‍ॅड. अमित देशमुख यांनी आभारप्रदर्शन केले. अ‍ॅड. विजय पाटील यांनी सुत्रसंचालन केले.

तरुणाईचा उत्साह, थरांचा थरथराट आणि ठाण्याची सामाजिक बांधिलकी हे गोकुळहंडीचे विशेष !

कृष्णा पाटील आयोजित ५५ लाखांची गोकुळहंडी वेधणार ठाणेकरांचे लक्ष ठाणे : शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या गोकुळहंडीची धूम पाहायला मिळणार आहे. भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांच्याकडून या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. गोकुळ दहीहंडी ही ठाण्यातील एक प्रतिष्ठित दहीहंडी बनली असून यामध्ये एकूण ५५ लाखांची बक्षिसे  आयोजकांकडून जाहीर करण्यात आली आहेत. तरुणाईचा उत्साह, थरांचा थरथराट आणि ठाण्याची सामाजिक बांधिलकी हे गोकुळहंडीचे विशेष असल्याची माहिती भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी दिली. प्रथम नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 5 लाख 55 हजार 555 रोख रक्कम व चषक बक्षीस दिले जाणार असून पुढील प्रत्येक नऊ थरास रुपये ३ लाख ३३ हजार ३३३ रुपये रोख रक्कम व चषक बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. ठाण्याची हंडी २ लाख २२ हजार २२२ रुपये व चषक त्याचबरोबर मानाची गोकुळ हंडी महिला गोविंदा पथकास एक लाख ११ हजार १११ व चषक अशी रक्कम बक्षीस दिली जाणार आहे. याशिवाय आठ थराची सलामी ५१ हजार व चषक,सात थराची सलामी १२ हजार व चषक, सहा थराची सलामी ९ हजार व चषक,पाच थराची सलामी ५ हजार व चषक, चार थराची सलामी ३ हजार व चषक, अशी बक्षिसे पुरुष गटासाठी असून सात थराची सलामी २५ हजार व चषक, सहा थराची सलामी १५ हजार व चषक, पाच थराची सलामी १० हजार व चषक, चार थराची सलामी ३ हजार व चषक अशी बक्षिसे महिलांसाठी ठेवण्यात आली आहेत. मागील वर्षी या दहीहंडीच्या निमित्ताने अर्जुन पुरस्कार विजेते त्याचप्रमाणे शिवछत्रपती पुरस्कार विजेते, व अन्य क्षेत्रातील क्रीडापटूंचा सत्कार करण्याचा अनोखा सामाजिक उपक्रम आयोजकांनी राबवला होता. यावर्षीही ठाण्याच्या हिताचे सामाजिक उपक्रम या दहीहंडीच्या निमित्ताने राबवले जातील असे आयोजक कृष्णा पाटील यांनी सांगितले आहे. ठाण्याच्या मूलभूत नागरिक समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या दहीहंडीच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे कृष्णा पाटील यांनी सांगितले. गोकुळ दहीहंडी ही हिंदू सणांचे प्रतीक बनतानाच तरुणाईचा उत्साह आणि शहराच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव याची सांगड घालणारी अनोखी दहीहंडी ठरेल असेही कृष्णा पाटील म्हणाले.या दहीहंडी निमित्त गोविंदांच्या मनोरंजनासाठी आर्केस्ट्रा, सिने कलाकार त्याचबरोबर मान्यवर लोकांच्या भेटीगाठी व मार्गदर्शन लाभणार असल्याचे कृष्णा पाटील यांनी यावेळी सांगितले.

कामोठेत शेतकरी कामगार पक्षातर्फे दहीहंडीचे आयोजन

पनवेल : कामोठे मध्ये शेतकरी कामगार पक्षातर्फे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत दहीहंडी उत्सव 2024 चे आयोजन 27 ऑगस्टदुपाला दुपारी तीन वाजता सिडको समाज हॉल समोर, सेंट्रल बँक चौक, सेक्टर 20, कामोठे येथे करण्यात आले आहे. माजी सभापती व नगरसेवक प्रमोद भगत यांनी या कार्यक्रमासाठी सर्व दहीहंडी, बाळ गोपाल यांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे. शेतकरी कामगार पक्षातर्फे कामोठे सालाबाद प्रमाणे दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. मोठ्या संख्येने दहीहंडी पथक या ठिकाणी येऊन हजेरी लावून सलामी देत असतात. तसेच दहीहंडी फोडल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडी तर्फे पारितोषिक मानधन व बक्षीस देण्यात येते. या दहीहंडी पाहण्यासाठी सर्व नागरिक त्या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहतात. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. 2024 या वर्षीची दहीहंडी मोठ्या जल्लोषात उत्सवात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या दहीहंडी उत्सवात  एकूण पारितोषिक 2 लाख 22 हजार 222 रुपयांची असणार आहेत. तसेच ट्रॉफी देखील देण्यात येणार आहेत . आठ थराच्या हंडी फोडणाऱ्या पथकाला प्रथम पारितोषिक (खुले) १ लाख ११ हजार १११ रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. तर सात थराच्या  सलामीसाठी 5001, सहा थराच्या सलामीसाठी 3001 आणि पाच थराच्या सलामीसाठी 2001 रुपये देण्यात येणार आहेत. यावेळी कोळीगीत, लोकगीत, मराठी गाण्यांचा आम्ही सारे कलाकार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आशियाई जलतरण स्पर्धेत पनवेलच्या सारा वर्तकची उल्लेखनीय कामगिरी

सारा वर्तकने ३ रौप्य पदकांसह २ कांस्य पदके पटकावली बँकॉक येथे पार पडलेल्या स्पर्धेत १४ राष्ट्रांच्या ६०० जलतरणपटूंचा सहभाग राज भंडारी पनवेल : बँकॉक येथे सुरू असलेल्या आशियाई शालेय निमंत्रित २५ मीटर जलतरण स्पर्धेत महाराष्ट्र जलतरण संघटनेच्या जलतरणपटूंनी प्रत्येकी सात सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी एकूण २१ पदकांची कमाई केली. यामध्ये पनवेलमधील कर्नाळा स्पोर्ट्स ॲकॅडमीची खेळाडू सारा वर्तक हिने ३ रौप्य आणि २ कांस्य पदकाची मिळून एकूण ५ पदके मिळवली. तिच्यातील आत्मविश्वास तिला स्पर्धेत टिकविण्यासाठी सरस ठरला असल्याची प्रतिक्रिया सारा हिने बोलताना स्पष्ट केले. आशियायी जलतरण स्पर्धेत एकूण १४ राष्ट्रांच्या ६०० जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत १९ वर्षांवरील मुलांमध्ये इचलकरंजीच्या सर्वेश गुरवने २०० मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात कांस्यपदक पटकाविले. या पदकाद्वारे महाराष्ट्राचे खाते उघडले. त्यानंतर त्याने २५ मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्ण, तर २०० मीटर बटरफ्लायमध्ये रौप्यपदक मिळवले. ठाण्याच्या राघवी रामानुजनने तीन सुवर्ण, एक कांस्य, तर मुंबईच्या अथर्व म्हात्रेने प्रत्येकी एक सुवर्ण, कांस्य, पुण्याच्या श्रीलेखा पारिखने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य, नंदिनी पेटकरने प्रत्येकी एक रौप्य, कांस्यपदकाची कमाई केली. शिवांशू कोर्तेने एक रौप्य, अर्जुन नाईकने एक कांस्य, ठाण्याच्या अर्जुन श्रीवास्तवने प्रत्येकी एक सुवर्ण, रौप्य, तर रायगड जिल्ह्यातील पनवेलच्या सारा वर्तकने तीन रौप्य आणि दोन कांस्यपदकाची कमाई केली. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमधील सर्वात लहान जलतरणपटू म्हणून कु. सारा अभिजीत वर्तक आहे. अवघ्या ६ वर्षांच्या साराने बँकॉक येथे झालेल्या आशियायाई शालेय जलतरण स्पर्धेत वयोगट 6 मध्ये भारतामधून महाराष्ट्र जलतरण संघाचे प्रतनिधीत्व करणाऱ्या स्पर्धकांमध्ये स्थान मिळविले. तिला मिळालेल्या पहिल्याच संधीमध्ये तिने 3 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली.

उलवे नोडमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

पनवेल : भारतीय जनता पार्टी व महिला मोर्चा उलवे नोड यांच्यावतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. उलवे नोड सेक्टर ९ मधील खारकोपर तलावाच्या बाजूला असलेल्या मैदानात या उत्सवाचे सायंकाळी ४ ते १० वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात ६ लाख ६६ हजार ६६६ रुपयांची एकूण बक्षिसे असणार असून महिलांसाठीही खास आकर्षक दहीहंडीही असणार आहे. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. अधिक माहितीसाठी ९८२०२२८०८१, ९६६४६४९९५०, ९०८२९८४६९३ किंवा ८१०८५९५९८५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उलवे नोड अध्यक्ष विजय घरत, महिला मोर्चा अध्यक्ष योगिता भगत यांनी केले आहे.

पेसा आदिवासी नोकरभरतीसाठी ठाणे-पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग बंद !

अनिल ठाणेकर ठाणे : पेसा कायद्यानुसार आदिवासी १७ संवर्गाच्या नोकरभरती झाल्या पाहिजेत म्हणून नाशिक येथे १ ऑगस्ट २०२४ रोजी पासून आमरण उपोषण सुरू आहे. त्यास पाठिंबा म्हणून २३ ऑगस्ट २०२४ रोजी डहाणू तालुक्यातील चारोटी नाका येथे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ या ठिकाणी डीवायएफआय युवा संघटना तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, कष्टकरी संघटना, इतर आदिवासी संघटना, यांच्या वतीने हजारों लोकांचा रस्ता रोको करण्यात आला. या वेळी डहाणू मतदारसंघाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले, विक्रमगड मतदारसंघाचे आमदार सुनील भुसारा, कष्टकरी संघटनेचे नेते ब्रायन लोबो, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव किरण गहला, डीवायएफआय चे राज्य अध्यक्ष नंदू हाडळ व जिल्हा सचिव राजेश दळवी, राज्य कमिटी सदस्य सुरेश भोये व दत्तू भोंडवा, किसान सभेचे नेते रडका कलांगडा, चंद्रकांत घोरखाना, रामू पागी, रामदास सुतार, सीटूचे नेते लक्ष्मण डोंबरे, तसेच माकप व इतर पक्षांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या पेसा भरती आंदोलनाला पाठिंबा म्हणून २४ ऑगस्ट २०२४ रोजी शहीद राजगुरू यांच्या जयंतीदिनी तलासरी तालुक्यातील तलासरी व उधवा बाजारपेठ १००% बंद ठेवून व्यापारी वर्गानेही चांगला प्रतिसाद दिला.