१५ कोटींच्या निधीतून थीम गार्डनसह इतर विकास कामे होणार!
आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणीवर मनपा आयुक्त संजय काटकर यांनी केले शिक्कामोर्तब!

 

अनिल ठाणेकर / अरविंद जोशी
भाईंदर : जनतेच्या भावनेचा आदर करत इंद्रलोक भागातील सर्वधर्मिय स्मृती उद्यान व पर्यावरण पूरक स्मशानभूमीचे काम रद्द करण्याची मागणी आमदार सरनाईक यांनी महापालिका आयुक्त संजय काटकर यांना पत्र लिहून केली होती. आमदार सरनाईक यांच्या मागणीची दखल घेत मनपा आयुक्तांनी शिक्कामोर्तब केले. याऐवजी आता त्याजागेत १५ कोटीच्या विकास निधीतून थीम गार्डनसह इतर विकास कामे विकसित करणार असल्याची घोषणा आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.
इंद्रलोक परिसरातील शासकीय जमिनीवर महापालिकेने सर्वधर्मीय  स्मृती उद्यान आणि पर्यावरण पूरक (इको फ्रेंडली) आधुनिक स्मशानभूमी प्रस्तावित केली होती. त्यासाठी १५ कोटींचा निधी राज्य सरकारकडून आला होता. पण या नागरी वस्तीत स्मशानभूमी येणार, सर्वधर्मीय स्मृती उद्यान होणार यामुळे काही लोक नाराज होते. स्थानिक हौसिंग सोसायट्या आणि नागरिकांनी महापालिका आयुक्त व आमदार प्रताप सरनाईक यांना निवेदने दिल्यावर सरनाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयात सर्वांची बैठक झाली. यावेळी मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर हेही उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार सरनाईक म्हणाले की, लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासन सर्वानी लोक भावनेचा आदर केला पाहिजे. मीरा भाईंदर शहरात वेगाने विकास होत आहे. भविष्याची लोकांची गरज ओळखून काही कामे प्रस्तावित केली गेली आहेत. गेल्या २ वर्षात मीरा भाईंदर शहराच्या विकास कार्यासाठी राज्य सरकारकडून ३ हजार कोटी विकास निधी आणला आहे. मीरा भाईंदरचा घोडबंदर खाडी किनारा विकास करण्यासाठी १५० कोटीचा प्रकल्प असून तेथे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट करणार आहोत अशी मोठी कामेही शहरात होत आहेत. लोकांना इंद्रलोक सर्वधर्मिय स्मृती उद्यान व पर्यावरण पूरक स्मशानभूमी नको असेल तर ते आरक्षण रद्द करुन लोकभावनेचा आदर करूया. इंद्रलोकच्या  शासकीय जमिनीत चांगले थीम गार्डन किंवा जनहितासाठी चांगली सुविधा विकसित करूया, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. याबद्दल इंद्रलोकच्या नागरिकांनी त्यांचे आभार मानले. भाईंदर पश्चिमेला १२.५ एकर शासकीय जागा असून त्याठिकाणी हे सर्वधर्मीय स्मृती उद्यान प्रस्तावित करावे, अशी सूचना आमदार सरनाईक यांच्याकडून करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर, विधानसभा संघटक सचिन मांजरेकर, विक्रम प्रताप सिंग, जिल्हा संघटक निशा नार्वेकर आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *