कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातील फेरीवाले हटविण्यात टाळाटाळ करून त्यांची पाठराखण करणारा कल्याण डोंबिवली पालिकेच्या क प्रभागातील फेरीवाला हटाव पथकाचा प्रमुख अरूण म्हात्रे यांना आयुक्त  डॉ. जाखड यांनी मंगळवारी तडकाफडकी निलंबित केले. पथक प्रमुख म्हात्रे यांना रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त ठेवण्याच्या सूचना, नोटिसा देऊनही ते कारवाईत निष्काळजीपणा करत असल्याचे निष्पन्न झाल्याने आयुक्तांनी स्वताहून त्यांच्यावर कारवाई केली.
या कारवाईने फेरीवाला हटाव पथकातील कामगार, पथक प्रमुखांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकापासूनचा १५० मीटरचा परिसर फेरीवाला मुक्त ठेवा. या भागातील रस्ते, पदपथ नागरिकांचा चालण्यासाठी, वाहन कोंडी मुक्त राहतील यादृष्टीने प्रयत्न करा, असे वारंवार आदेश आयुक्त डाॅ. जाखड यांनी नियंत्रक उपायुक्तांना दिले आहेत.
कल्याण बाजारपेठेचे केंद्र आहे. याठिकाणी मुरबाड, शहापूर, भिवंडी, वाडा परिसरातून व्यापारी, नागरिक खरेदीसाठी येतात. नागरिकांना शहरात आल्यावर वाहन कोंडी, फेरीवाल्यांचा त्रास होता कामा नये, असे सतत सांगुनही क प्रभागाचे फेरीवाला हटाव पथकाचे प्रमुख अरूण म्हात्रे फेरीवाल्यांवर आक्रमक कारवाई करण्यात टाळाटाळ करत होते. म्हात्रे यांना गेल्या चार महिन्यात चार वेळा कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तरीही फेरीवाल्यांवर कारवाई करण्याच्या कृतीत कोणतीही सुधारणा झाली नव्हती.
फेरीवाल्यांंमुळे शिवाजी चौक, महमद अली रस्ता, रेल्वे स्थानक परिसर फेरीवाल्यांनी गजबजून जात आहेत. या कोंडीत वाहने, नागरिक अडकून पडत आहेत. म्हात्रेंचे वर्तन बेजबाबदारपणाचे असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा अहवाल अतिक्रमण नियंंत्रण विभागाच्या उपायुक्तांनी आयुक्त डाॅ. जाखड यांच्या समोर ठेवला होता. आयुक्तांनी प्रस्ताव तडकाफडकी मंजूर केला.
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात बहुतांशी फेरीवाले मुंब्रा, भायखळा, अंधेरी, मस्जिद भागातील आहेत. या फेरीवाल्यांच्या माध्यमातून दरमहा मोठा गल्ला क प्रभाग फेरीवाला हटाव पथकाकडून केला जात असल्याच्या तक्रारी वाढत होत्या.
आयुक्त डाॅ. जाखड यांनी दहा प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कामगारांची दर सहा महिन्यांनी चक्राकार पध्दतीने बदली करण्याची नागरिकांची मागणी आहे. एकाच प्रभागात कामगार ठाण मांडून बसतात. फेरीवाला हटाव पथकातील अनेक कामगारांच्या रेल्वे स्थानक, बाजारात आठ ते दहा हातगाड्या असल्याची चर्चा आहे.
केंद्रीय पथक सुशेगात
दहा प्रभागांमधील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी राजू शेलार यांच्या नेतृत्वाखाली एक पथक मुख्यालयात आहे. ते पथक काय काम करते. हे पथक डोंबिवली, टिटवाळ्यात जाऊन फेरीवाल्यांवर कारवाई करते, कल्याणचे फेरीवाले त्यांना दिसत नाहीत का, असे प्रश्न तक्रारदार उपस्थित करत आहेत. फेरीवाले हटविण्याची जबाबदारी साहाय्यक आयुक्त, अधीक्षक यांची आहे. त्यामुळे अरूण म्हात्रे यांच्या बरोबर या प्रभागाचे शासकीय सेवेतील साहाय्यक आयुक्त, अधीक्षक यांच्यावरही आयुक्तांनी कारवाई करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून जोर धरत आहे. पालिकेत वरिष्ठांकडून शासकीय, स्थानिक पालिका कर्मचारी असा दुजाभाव केला जात असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *