पनवेल शहर पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
राज भंडारी
पनवेल : शहरातील गजबजलेल्या ठिकाणी राहणाऱ्या एका ४० वर्षीय इसमाने याच परिसरात राहणाऱ्या ८ वर्षीय बालिकेला घरातील बाथरूममध्ये नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. याबाबत आरोपी विरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
शहरातील वाल्मिकी नगर परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय इसमाने सोमवारी दिनांक ०३ सप्टेंबर रोजी परिसरात राहणाऱ्या ८ वर्षीय मुलीला बोलावून तिला घराच्या समोरील शौचालयात नेवून तिच्यावर अत्याचार केला. याबाबत पीडित मुलीने घडला प्रकार आपल्या आईजवळ कथित केल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पनवेल शहर पोलिस ठाणे गाठले. यावेळी पोलिसांनी सदर घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपीला अटक केली. याबाबत आरोपींविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात सह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पनवेल शहर पोलिस करीत आहेत.
