जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह इच्छुकांनी गाठले प्रदेश कार्यालय
अनिल ठाणेकर
ठाणे : महाविकास आघाडीच्या जागावाटपावर खलबते सुरू आहेत. त्यावर अद्याप निर्णय झालेला नसतानाच ठाणे शहरातील चारपैकी तीन जागा लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कळवा – मुंब्रा मतदारसंघात डॉ. जितेंद्र आव्हाड हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, त्याचवेळेस ठाणे आणि ओवळा – माजिवडा मतदारसंघांवरही ठाणे राष्ट्रवादीने दावा केला आहे. बुधवारी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह सर्व इच्छुकांनी प्रदेश कार्यालय गाठून निवडणूक लढविण्यासाठी आपले अर्ज सादर केले आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच अनुषंगाने ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाने ठाणे आणि ओवळा माजिवडा मतदारसंघावर दावा केला आहे. सन २०१९ मध्ये ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून सुहास देसाई यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी पक्षाच्या विनंतीवरून अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे या मतदारसंघात भाजप विरूद्ध मनसे अशी लढत झाली होती. त्यामध्ये संजय केळकर हे विजयी झाले होते. त्यावेळेस मनसेच्या अविनाश जाधव यांच्या मतांमध्ये एकसंघ राष्ट्रवादीच्या मतांचा मोठा वाटा होता. त्यामुळेच आता राष्ट्रवादीने या मतदारसंघावर पुन्हा दावा केला आहे. तर ओवळा – माजिवडा मतदारसंघात सन २०१४ मध्ये तेव्हा राष्ट्रवादीत असलेल्या हनुमंत जगदाळे यांनी निवडणूक लढविली होती. सन २०१९ मध्ये काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांनी निवडणूक लढविली होती. मात्र, २०१९ नंतर आपणच येथे मोठा भाऊ असल्याचा दावा करीत निवडणूक लढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे ठाणे शहर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी पुरूषोत्तम पाटील, महेंद्र पवार, गजानन चौधरी, दीपक क्षत्रिय या चौघांनी तर ओवळा माजिवडा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मधुर राव आणि राणी देसाई यांनी पक्षश्रेष्ठींना गळ घातली आहे.
