स्वाती घोसाळकर
मुंबई : महाविकास आघाडीत सारं काही आलबेल आहे असे चित्र दर्शविले जात असले तरी वस्तुस्थिती मात्र तशी नाही. सध्यातरी महायुतीत दोन विरुध्द एक अशी स्थिती आहे. कालपरवापर्यंत मुख्यमंत्री निवडीपरून ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरुध्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असं चित्र होते, आज त्यात शरद पवारांनी उडी घेत हा मुकाबला आता दोन विरुध्द एक असा केला आहे. पण शरद पवारांनी जाहिरपणे नाना पटोलेंच्या बाजूने मत व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीसाठी आधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, अशी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीत मागणी आहे. महाविकास आघाडीच्या जाहिर मेळाव्यात त्यांनी नाना पटोले आणि शरद पवारांच्या उपस्थितीत काही आठवड्यापुर्वी तशी मागणी केली होती. नाना पटोलेंनी काँग्रेसच्या वतीने याला जाहिर विरोध केला होता. पण शरद पवारांनी मौन बाळगले होते. असं असताना शरद पवार यांनी आज या वादाला पुन्हा फोडणी दिलीय. “निडणुकीनंतर संख्याबळावर नेतृत्वाचा निर्णय घ्यायचा असतो”, असं शरद पवार म्हणाले आहेत. “मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आताच जाहीर करावा, असं आवश्यक नाही”, असं शरद पवार म्हणाले आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांच्या भूमिकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची काय भूमिका असेल? असा प्रश्न उपस्थित होतोय.
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहिर न केल्यास महाविकास आघाडीतच स्वताचे उमेदवार जास्त निवडूण आणण्यासाठी सहकारी मित्र पक्षांचे उमेदवार पाडापाडीचे राजकारण केले जाते. याला रोखण्यासाठी ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आधी ठरवूया असा प्रस्ताव ठेवला होता. पण आज शरद पवारांनी मात्र ठाकरेंपेक्षा वेगळी भुमिका मांडलीय.
“मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत विचार करण्याचं आता काहीच कारण नाही. निवडणुकीनंतरच्या संख्याबळावर मुख्यमंत्रीपदाचा विचार, अजून कशाचा काही पत्ता नाही. बहुमत मिळेल यात शंका नाही, पण आताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही. 1977 साली आणीबाणीनंतर निवडणूक झाली. तेव्हा कुणाचंही नाव पुढे केलं नव्हतं. मतं मागताना मोरारजी देसाई यांचं नाव नव्हतं. पण निकालानंतर त्यांचं नाव पुढे आलं. त्यामुळे आताच नाव जाहीर केलं पाहिजे, असा आग्रह करण्याची आवश्यकता नाही. आम्ही तीनही पक्ष एकत्र बसू आणि राज्याला स्थिर सरकार देऊ”, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवारांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. “शरद पवार काही चुकीचं बोलले नाहीत. आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाणार आहोत. संख्याबळ पाहूनच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा फायनल होईल”, असं नाना पटोले म्हणाले