मनसे उपाध्यक्ष-ओवळा माजीवडा विधानसभा क्षेत्राचे उपशहराध्यक्ष पुष्कराज विचारे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली मागणी
ठाणे : घोडबंदर रोडवरील होणारी रोजची वाहतूक कोंडी ठाणेकरांसाठी विशेषतः या मार्गावर ये जा करणाऱ्या नागरिकांकरता डोकेदुखी ठरली आहे. गुरुवारी या वाहतूक कोंडीमुळे ठाण्यातील बहुतेक शाळांना सुट्टी जाहीर करावी लागली. या पार्श्वभूमीवर एक उच्चस्तरीय समिती नेमून शालेय बस आणि रुग्णवाहिकांकरता स्वतंत्र मार्गिका तयार करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष-ओवळा माजीवडा विधानसभा क्षेत्राचे उपशहराध्यक्ष पुष्कराज विचारे यांनी केली. यासंदर्भात पुष्कराज विचारे यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे केली आहे.
गुरुवारी घोडबंदर रोडवर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे ठाणेकरांचे अतोनात हाल झाले. कित्येकांनी वाहतुकीत अडकल्यामुळे पुन्हा घरी जाणे पसंत केली. या वाहतूक कोंडीमुळे घोडबंदर परिसरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून रुग्णाच्या जीवावर बेतू शकते त्यामुळे काही दुदैवी घटना घडल्यावरच प्रशासन लक्ष देणार का?असा सवाल पुष्कराज विचारे यांनी केला आहे. या परिसरात होणाऱ्या नेहमीच्याच वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ठाणे महापालिका आणि इतर शासकीय यंत्रणांचा समावेश असलेली उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी असे पुष्कराज विचारे यांनी सांगितले.
0000
