माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध
मुंबई : राज्यात पहिल्यांदाच शिवसेना पक्षाकडून महाराष्ट्र सैनिक आघाडीची स्थापना करण्यात आली. मनोज डांगे, दत्तात्रेय पवार, कॅप्टन परशुराम शिंदे यांच्यासह अनेक निवृत्त सैनिक आणि माजी लष्करी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. याबाबत मुंबईतील नंदनवन बंगला येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शिवसेना पक्षात आज नौदल, वायूसेना आणि लष्करातील निवृत्त अधिकाऱ्यांनी प्रवेश केला. महाराष्ट्र सैनिक आघाडीसाठी राम रेपाळे यांनी यासाठी पाठपुरावा केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी त्यांनी १९८५-८६ मध्ये काळात लष्करात निवड झाली होती, मात्र मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. त्यामुळे मी बाळासाहेबांचा आणि दिघेसाहेबांचा सैनिक झालो, अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली. कलम ३७० हटवल्यानंतर काश्मिरमध्ये कुपवाडा येथे सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी लष्कराने बोलावले होते. अनेकांनी तिथं जाऊन नका दहशतवाद्यांचा धोका आहे, असे सांगितले होते मात्र आपला लष्करावर विश्वास होता, तिथे गेलो आणि महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. महाराजांच्या हातातील तलवारीचे टोक पाकिस्तानच्या दिशेने असल्याने पाकिस्तान कधीही हिंदुस्थानावर वाकड्या नजरेने बघणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. श्रीनगर येथे मराठा भवनासाठी सरकारला जागा मिळाली असून तिथं दिमाखात उभे राहील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सैनिक आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी माजी सैनिक, वीरमाता, वीर पत्नींसाठी महाराष्ट्र सैनिक आघाडीने काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. माजी सैनिकांच्या कल्याणाचे अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. राज्यातील माजी सैनिकांसाठी हे सरकार कटिबद्ध आहे. त्यांच्या कल्याणाकरिता हात आखडता घेणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
