८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष, एकता विनायक संस्थेचे उपनगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मागाठाणे मित्र मंडळ, प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय अशा विविध संस्थांचे संस्थापक, आधारस्तंभ विजय दत्तात्रय वैद्य यांचे शनिवारी सकाळी दुःखद निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी वैशाली, मुलगा वैभव, विक्रांत, सुना प्रतिमा आणि अनघा, नातवंडे हर्षल आणि गौरी असा परिवार आहे. शुक्रवारी दिवसभर उपनगरचा राजा गणेशोत्सव मंडळाची आमंत्रणे वाटण्याचे काम त्यांनी केले होते. शनिवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला पण त्यांची तिथेच प्राणज्योत मालवली. दुपारी दोन वाजता त्यांची अंत्ययात्रा एका सजवलेल्या रथातून ॲम्ब्रोसिया येथून निघाली. विजय वैद्य यांची कर्मभूमी असलेल्या जय महाराष्ट्र नगर येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आला. तेथे अंतीम इच्छेनुसार आजच्या सर्व वर्तमानपत्रे त्यांच्या पार्थिवा जवळ ठेवण्यात आली. बॅंड पथकाने भक्तीगीते वाजवून त्यांना मानवंदना दिली. हा स्वर्गरथ जय महाराष्ट्र नगर येथून बोरीवली पूर्व येथील दौलतनगर स्मशानभूमी येथे नेण्यात आला. सर्व वैदिक विधी पूर्ण करण्यात आले. ज्येष्ठ चिरंजीव वैभव याने पार्थिवाला शोकाकुल वातावरणात अग्नी दिला. ॲम्ब्रोसिया, जय महाराष्ट्र नगर आणि दौलतनगर स्मशानभूमी येथे सर्व स्तरातील लोकांनी उपस्थित राहून साश्रुनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. मुंबई मराठी पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे पदाधिकारी, वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रे यांचे प्रतिनिधी, विविध राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, रिक्षाचालक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, घरेलू कामगार असे सामान्य नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजय वैद्य यांना मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा कृ. पा. सामक जीवनगौरव पुरस्कार तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला होता. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. उपनगर साहित्य संमेलन सुद्धा त्यांनी भरविले होते.