Photo-5
अनिल ठाणेकर
ठाणे : उदय नगर, पांचपाखाडी येथे २६ जानेवारी १९७९ रोजी काही तरुणांनी एकत्र येत विधायक उद्देश ठेवून गणेशोत्सवाची सुरुवात केली. फक्त गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता या तरूणांनी सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात आपला झेंडा रोवला. त्यामुळेच ४६ वर्षांपूर्वी लावलेला नरविर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा वेलू गगनाला भिडला आहे. आज हा गणेशोत्सव “ठाण्याचा राजा” म्हणून राज्यभर ओळखला जात आहे.
या वर्षी विष्णू दशावतार साकारणाऱ्या “ठाण्याचा राजा” अर्थात नरविर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सन १९७९ पासून शहीद स्मारक, राजवाडा, महाराष्ट्राचे संस्कृतीदर्शन, हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतिक असलेला काश्मिरमधील चरार-ए-शरीफ दर्गाह, स्वातंत्र्यानंतरचा भारत, स्वातंत्र्य लढ्यातील ठाणे शहर, मराठी माणसा जागा हो, भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी कलाकृती, युवाशक्ती, गणेश दरबार, मिनाक्षी मंदिर, गुंफा मंदिर, पार्वती महाल, राजस्थानी कलाकृतीचे दर्शन घडविणारा महाल, जोधा-अकबर महालाची प्रतिकृती, सुवर्ण स्वर्ग अशा वैविध्यपूर्ण सजावटी साकारुन केवळ राज्यातच नव्हे तर देशात गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक परंपरा पोहचविली आहे. ही परंपरा पोहचवित असतानाच या मंडळाचे प्रमुख सल्लागार, माजी मंत्री, आमदार डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सामाजिक कार्यामध्येही आपला ठसा उमटवत आहे. राज्यात निर्माण झालेली आपत्ती असो, गोरगरीब- आदिवासी समाजाच्या अडीअडचणी असो; गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या असोत, आरोग्य शिबिरे असोत; मंडळाचे कार्यकर्ते हिरीरीने पुढे येऊन स्वतःला सामाजिक कार्यात झोकून देत असतात. मंडळाचे अध्यक्ष संदीप पवार, कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे , उपाध्यक्ष संदेश प्रभू, सरचिटणीस रमेश चौधरी , खजिनदार दीपक भांगरथ आणि त्यांचे सहकारी गेली अनेक वर्षे सामाजिक समता, सर्वधर्मसमभाव याच संकल्पनेवर प्रबोधनाचा वारसा पुढे नेत आहेत.
