नवी मुंबई: सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, विजय सिंघल यांनी सिडकोच्या विविध पाणी पुरवठा योजनांच्या प्रकल्पस्थळांना भेट देऊन, सिडकोतर्फे राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा घेतला व संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. या प्रसंगी गणेश देशमुख, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, शीला करूणाकरण, मुख्य अभियंता (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व विशेष प्रकल्प), सिडको,  पी. व्ही. मूल, अधीक्षक अभियंता, सिडको व अन्य संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सर्वप्रथम उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी 270 एमएलडी, हेटवणे पाणी पुरवठा आवर्धन योजनेच्या प्रकल्प स्थळास भेट दिली. त्यानंतर त्यांनी सिडको विमोचकाचे स्थळ व हेटवणे धरणाच्या पायथ्याशी प्रस्तावित असलेल्या प्रक्रीया विरहित पाण्याच्या बोगद्यासाठी तयार करण्यात आलेल्या बांधकाम विहीरीची (Shaft) पाहणी केली. त्याचप्रमाणे जिते येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या स्थळासोबतच नव्याने साकारण्यात येत असलेल्या 270 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राच्या सद्यस्थितीचीदेखील पाहणी केली. याचबरोबर प्रक्रिया विरहित व प्रक्रिया केलेल्या पाण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या बोगद्यासाठी तयार करण्यात आलेल्या बांधकाम विहीरीच्या कामाचीदेखील त्यांनी पाहणी केली.
याचबरोबर साई गावातील बांधकाम विहीरीची (Shaft) देखील त्यांनी पाहणी केली. त्याचबरोबर येथे प्रस्तावित असलेल्या एप्रोच व टेल टनेलच्या कामाचा शुभारंभदेखील सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, विजय सिंघल यांच्या हस्ते करण्यात आला. सदर जल बोगद्याचे काम संयंत्राद्वारे ऑक्टोबर अखेर सुरूवात करण्यात येईल.
कोट
सिडको अधिकारक्षेत्रातील भविष्यातील वाढत्या लोकसंख्येची पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी सिडकोतर्फे विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. आज त्यातील महत्वाच्या स्थळांची पाहणी केली असता सर्व कामे समाधानकारकरित्या प्रगतीपथावर असल्याचे दिसून आले आहे. सदरची कामे वेळेवर पूर्ण व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचनादेखील दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात सिडको अधिकारक्षेत्रातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा होईल यात शंका नाही.
विजय सिंघल
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *