मुंबई : रिपब्लिकन पक्षाचा ६८ वा स्थापना दिन आणि त्याचे एक संस्थापक – नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गुरुवारी ३ ऑक्टोबर रोजी मुंबईत आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर एक प्रबोधन सभा पार पडणार आहे. आंबेडकरवादी भारत मिशन आणि डॉ.आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक चेंज या संस्थांनी संध्याकाळी ५ वाजता दादर ( पूर्व) येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात ही सभा आयोजित केली आहे. अर्थतज्ज्ञ, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखालील ही सभा सुरेंद्र गावस्कर सभागृहात पार पडणार आहे.
या प्रबोधन सभेत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष,संविधान तज्ज्ञ ॲड. डॉ. सुरेश माने, दलित साहित्यिक अर्जुन डांगळे, शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर, चर्मकार नेते अच्युत भोईटे, ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे, पुण्यातील प्रजासत्ताक जनता परिषदेचे नेते प्रबुद्ध साठे हे प्रमुख वक्ते आहेत. या सभेला अनुसूचित जाती, जमातींच्या बांधवांनी या मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन आंबेडकरवादी भारत मिशनतर्फे दलित पँथरचे नेते सुरेश केदारे आणि ज्येष्ठ बँक कर्मचारी नेते सतीश डोंगरे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
0000
