नवी मुंबईतील हजारो विद्यार्थी उत्साहाने सहभागी
नवी मुंबई : ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियान अंतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर करणारी असून स्वच्छता व पर्यावरण विषयक जाणीव जागरुकता निर्माण करणारी आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांवर स्वच्छता संस्कार करण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण जागरुकतेवरही भर दिला जात आहे.
अशाच प्रकारचा ‘एक पेड माँ के नाम’ हा अभिनव उपक्रम अभियानांतर्गत स्वच्छ भारत मिशनच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महानगरपालिकेच्या तसेच खाजगी शाळांमध्ये उत्साहाने राबविण्यात आला. यामध्ये शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व त्याला वृक्षारोपण करणा-या विद्यार्थ्याच्या आईचे नाव देण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी कुंडयांमध्येही रोपे लावली. वातावरणातील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड करणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार करीत प्रत्यक्ष वृक्षरोपणाच्या कृतीतून त्यांना वृक्षांचे महत्व पटवून देण्यात आले.
त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या 57 प्राथमिक व 23 माध्यमिक तसेच 200 हून अधिक खाजगी शाळांमध्ये स्वच्छता विषयक प्रचार-प्रसार करण्यासाठी ‘स्वच्छता दौड’ आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छता व पर्यावरण विषयक घोषवाक्यांचे फलक घेऊन धाव घेत स्वच्छतेचा जागर केला. नमुंमपा व खाजगी शाळांतील 84700 हून अधिक विद्यार्थ्यांनी नमुंमपा शिक्षण विभागाच्या माध्यमातून आयोजित ‘स्वच्छता दौड’ हा उपक्रम यशस्वी केला.
०००००