भटाळे तलाव बुजवून उभारली होती बेकायदा बांधकामे
कल्याण : कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भटाळे तलावात भराव टाकून या भागातील ४० फुटी विकास आराखड्यातील रस्त्यावर स्थानिकांनी बेकायदा व्यापारी गाळे, तबेले, निवासी इमले उभारले होते. संवेदनशील भागातील विकास आराखड्यातील रस्ता बाधित झाल्याने या रस्त्याचे रुंदीकरण रखडले होते. शनिवारी कल्याण डोंबिवली पालिकेच्या पथकांनी पोलीस बंदोबस्तात या रस्ते मार्गातील सर्व बेकायदा अतिक्रमणे पोकलेन, जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केली.
ही कारवाई करताना या भागातील माजी नगरसेवक, काही स्थानिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. बाजारपेठ पोलिसांनी विरोध करणाऱ्या माजी नगरसेवकाला ताब्यात घेऊन कारवाईत कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घेतली. ही कारवाई करण्यापूर्वी क प्रभागाचे साहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे यांनी अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांना पूर्व सूचना नोटिसा दिल्या होत्या. शनिवारी सकाळी उपायुक्त प्रसाद बोरकर, साहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे, सर्वेअर संजय पोखरकर, साहाय्यक आयुक्त सोनम देशमुख, सविता हिले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर गौड आणि तोडकाम पथकाचे ४० कर्मचारी, पोलीस आणि जेसीबी पथकाने भटाळे तलावाजवळील ४० फुटी रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली.
ही कारवाई सुरू करण्यापूर्वी तबेल्यांमधील सुमारे तीनशेहून अधिक म्हशी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्या. कारवाईत अडथळा आणण्यासाठी तबेले चालकांनी म्हशी हेतुपुरस्कर तबेल्यात बांधून ठेवल्या होत्या. कारवाई सुरू होताच एका माजी नगरसेवकाने या कारवाईत अडथळा आणून घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
गेल्या पंधरा वर्षाच्या कालावधीत या भागातील स्थानिकांनी भटाळे तलावात भराव टाकून तलावाजवळून गेलेल्या या भागातील विकास आराखड्यातील ४० फुटी रस्त्यावर अतिक्रमणे केली होती. हा भाग संवेदनशील असल्याने यापूर्वीचे पालिका अधिकारी या अतिक्रमणांवर कारवाई करण्यास कुचराई करत होते.
कोट
विकास आराखड्यातील ४० फुटी रस्त्यावरील २५ पैकी २२ अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. उर्वरित अतिक्रमणे लवकरच जमीनदोस्त केली जातील. अतिक्रमणधारकांना पूर्वसूचना देऊन, येथील तबेल्यांमधील म्हशी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून ही कारवाई करण्यात आली आहे- तुषार सोनवणे, साहाय्यक आयुक्त, क प्रभाग, कल्याण.
०००००