मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे हृदय विकाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून त्यामुळे रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील २३ रुग्णालयांमध्ये कॅथलॅब सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पुढील काही महिन्यांत कॅथलॅब सुरू करण्याचे नियोजित आहे.
हृदयविकाराचा झटका आल्याने प्राथमिक व ग्रामीण रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना मुंबई, पुण्यासारख्या शहरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये पाठविण्यात येते. रुग्णालयात पोहोचेपर्यंत अनेकदा रुग्णांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे रुग्णांना गोल्डन अवरमध्ये उपचार मिळावेत यासाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालयामध्ये विशेषोपचार आरोग्य सुविधा पुरविण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा रुग्णालयात हृदयविकाराच्या रुग्णांना अद्ययावत उपचार मिळावेत यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २३ जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅथलॅब सुरू करण्यात येणार आहेत.
एसटी एलिव्हेशन इन मायोकार्डियल इन्फार्क्शन (स्टेमी) प्रकल्पांतर्गत या कॅथलॅब सुरू करण्यात येणार आहेत. राज्यातील २० रुग्णालयांमध्ये ही अतिविशेषोपचार सुविधा उपलब्ध आहेत. मात्र जिल्हा रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांचे होणारे हाल लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅथलॅब सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅथलॅब सुरू झाल्याने जिल्हा रुग्णालयांमध्ये ॲन्जिओप्लास्टी करणे शक्य होणार असल्याचे आरोग्य विभागाचे संचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले.
एप्रिल २०२१ मध्ये आरोग्य विभागाने स्टेमी हा प्रकल्प सुरू केला. पहिल्या टप्प्यात पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, नांदेड, औरंगाबाद, अकोला, रत्नागिरी, सोलापूर, वर्ध्यासह १२ जिल्ह्यांमध्ये ३८ मुख्य केंद्रे आणि उपकेंद्रे सुरू करण्यात आली होती. त्यानंतर एप्रिल २०२४ मध्ये २२ जिल्ह्यांमधील २२० ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, जिल्हा व सर्वसाधारण रुग्णालय तसेच १९०६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या सेवेचा विस्तार केला. या केंद्रांवर अत्याधुनिक ईसीजी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रुग्णाचा ईसीजी करण्यात आल्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या माध्यमातून अवघ्या चार मिनिटांमध्ये हृदयरोग तज्ज्ञांकडून ईसीजीचे विश्लेषण आणि निदान केले जाते. त्यानंतर हा अहवाल इंटरनेटच्या माध्यमातून संबंधित रुग्णालयाला पाठवले जाते व रुग्णाला रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णालयात नेले जाते, अशी माहिती डॉ. लाळे यांनी दिली.
अंदाजे १४ कोटी रुपये खर्च
कॅथलॅब उभारण्यासाठी अंदाजे १३ ते १४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे राज्यातील २३ रुग्णालयांमध्ये कॅथलॅबची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येण्याची शक्यता आहे. हा निधी महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेतील अतिरिक्त निधीतून करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *