सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे हेलिकॉप्टर भरकटले ० कोयनेच्या बॅकवॉटरवर १५ फुटापर्यंत खाली आले ० मुख्यमंत्री सुरक्षित, दिल्लीला रवाना

 

पुणे : देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती आज आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे आज इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे गावाहून पुणे विमानतळाच्या दिशेला रवाना झाले होते. यावेळी खराब हवामानामुळे त्यांचं हेलिकॉप्टर हवेत भरकटलं होतं. कोयनेच्या बॅकवॉटरमध्ये १५ फुटापर्यंत हे हेलिकॉप्टर खाली आले होते. पण कॅप्टनच्या कौशल्यामुळे अखेर या हेलिकॉप्टरचे सुरक्षित लॅंण्डींग करण्यात आले. महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेच्या आशिर्वादामुळेच आम्ही या अपघातातून बचावलो अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्र्यांसमवेत असणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावाहून पुण्याच्या दिशेला रवाना झाले होते. या दरम्यान अचानक हवामान खराब झालं आणि पावसाला सुरुवात झाली. यामुळे हेलिकॉप्टरला पुढे जाण्यास अडचणी येऊ लागल्या. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर पुढे जाण्याऐवजी मागे येऊ लागले. वाऱ्याचा आणि पावसाचा वेग इतका जास्त होता की, हेलिकॉप्टर जमिनीपासून केवळ 15 फूट अंतरापर्यंत पोहोचलं होतं. विशेष म्हणजे खाली कोयना धरणाचं बॅकवॉटर होतं. तसेच आजूबाजूला हेलिकॉप्टर लँड करण्यासारखी जमीन नव्हती. पण पायलटने प्रसंगावधान साधल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या संकटातून बचावले. मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये असलेले त्यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, मंगेश चिवटे आणि विशेष कार्य अधिकारी कवळे सुखरुप आहेत. शिंदे यांचं हेलिकॉप्टर पुन्हा दरे गावात लँड करण्यात आलं आणि ते रस्ते मार्गाने पुण्याच्या दिशेला रवाना झाले. एकनाथ शिंदे जागावाटपाच्या बैठकीसाठी सायंकाळी दिल्लीला रवाना झाले.

“ हेलिकॉप्टर भरकटल्यानंतर आजूबाजूच्या कोणत्याही एका शेतामध्ये हेलिकॉप्टर लँड करावे का? याबाबत पायलट आमच्याजवळ विचारणा करत होते. पण त्या सोयीची कोणतीही जमीन आजूबाजूला नसल्याने आमचे हेलिकॉप्टर पुन्हा एकदा माघारी दरे या गावाच्या दिशेने निघाले. जेथून आम्ही टेकऑफ घेतला होता त्याच ठिकाणी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लँड झाले आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मोटारीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले”, असं मंगेश चिवटे यांनी सांगितलं.

“अशावेळी कोणत्याही प्रकारची जीवितहानी होण्याची संभावना अधिक प्रमाणात असताना महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्वजण सुखरुप आहोत. या संपूर्ण प्रसंगादरम्यान वाचताना केलेल्या पुण्यकर्माची आठवण झाली. आता आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो आहोत”, अशी प्रतिक्रिया मंगेश चिवटे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *