महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई: विधानसभा निवडणुकीत भाजपची भिस्त मित्र पक्षांपेक्षाही मत विभागणीवरच अधिक आहे, असे नमूद करत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ दिलेल्या काही छोट्या – मोठ्या आंबेडकरवादी संघटना आणि गटांनी यावेळीही महाविकास आघाडीसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे दलित संघटनांसोबत झालेल्या एका संयुक्त बैठकीत महविकास आघाडीतर्फे ज्येष्ठ शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई यांनी एका बैठकीत स्वागत केले आहे. त्या पार्श्वभूमीवर, ‘ रिपब्लिकन एकता आघाडी ‘ च्या मुंबईत नुकत्याच झालेल्या एका बैठकीत प्रचारमध्ये ‘ मविआ ‘ तील तीनही पक्षांशी संवाद, संपर्क राखण्यासाठी एक समन्वय समितीही स्थापन करण्यात आली आहे. ही बैठक आझाद मैदान येथील रिपब्लिकन पक्ष ( खोरिप) कार्यालयात पार पडली. रिपब्लिकन एकता आघाडीच्या या समन्वय समितीमध्ये सुरेश केदारे ( दलित पँथर), मिलिंद सुर्वे ( पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र), भाऊ निरभवणे (रिपब्लिकन पक्ष – खोब्रागडे), सागर संसारे ( स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष) रवी गरुड (दलित सेना ), मनोज बागुल ( रिपब्लिकन जनशक्ती), प्रकाश हिवाळे ( लोक मोर्चा), सतीश डोंगरे ( आंबेडकरवादी भारत मिशन), बंधुराज लोणे ( ज्येष्ठ पत्रकार) यांचा समावेश आहे. या समन्वय समितीमधील सदस्यांसहित या रिपब्लिकन एकता आघाडीच्या बैठकीला प्रख्यात साहित्यिक अर्जुन डांगळे, कॉ. सुबोध मोरे, मिलिंद पखाले ( नागपूर ), ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, भगवान गरुड (स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष), भागवत कांबळे ( रिपब्लिकन पक्ष – खोब्रागडे ), मंगेश पगारे ( पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र), शिवाजी गायकवाड, अनिल लगाडे, शशिकांत हिरे, रामानंद पाला हे घटक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सत्तांतराला सर्वोच्च प्राधान्य या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेत सत्ता बदलाचे वारे जोरात वाहत असून बौद्ध, दलित, आदिवासी हे समाजही त्याला अपवाद नाहीत. किंबहुना परिवर्तनाची सर्वाधिक गरज त्यांना आहे. त्यातच भाजपने ही निवडणूक केवळ सत्ता टिकवण्यासाठी नव्हे, तर राज्यसभेत बहुमत प्राप्त करण्यासाठी अधिक महत्वाची मानली आहे. कारण त्या बहुमता नंतरच भाजपला जाचक वाटत असलेले धर्मनिरपेक्ष राष्ट्र आणि संविधान याबाबत निर्णायक पावले उचलणे शक्य होणार आहे. त्यामुळे बौद्ध समाजाने, आंबेडकरी चळवळीने यावेळी सत्तांतर घडवण्यास सर्वोच्च प्राधान्य देणे काळाची गरज ठरली आहे, असे रिपब्लिकन एकता आघाडीने आपल्या पत्रकात म्हटले आहे. स्वतंत्र आंबेडकरवादी राजकारण दीर्घ पल्ल्याची प्रक्रिया स्वतंत्र आंबेडकरवादी राजकारणाची उभारणी ही केवळ निवडणूक काळातच करण्याची गोष्ट मुळीच नाही. ती गंभीरपणे करण्याची दीर्घ पल्ल्याची प्रक्रिया आहे, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच निवडून येण्याची सर्वांगीण क्षमता आणि स्वतःसाठी मतदासंघांची बांधणी या गोष्टींच्या अभावामुळे आंबेडकरवादी पक्षांच्या उमेदवारांच्या विजयाची शक्यता दुरावली आहे. त्यातच ‘ स्वबळावर लढत ‘ आणि ‘ स्वतंत्र आघाड्यांची निर्मिती ‘ हे दोन्ही पर्याय आंबेडकरवादी राजकारणासाठी आजवर नेहमीच निरुपयोगी ठरले आहेत, याकडे रिपब्लिकन एकता आघाडीने लक्ष वेधले आहे. 00000