Month: October 2024

 सतर्कता अधिकारी प्रवीणकुमार यांनी दिली भ्रष्टाचार न करण्याची शपथ

 बँक ऑफ इंडिया तर्फे दक्षता जनजागृती सप्ताहनिमित्त अलिबाग : अशोक गायकवाड बँक ऑफ इंडिया तर्फे दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी बँक ऑफ इंडियाचे सतर्कता अधिकारी प्रवीणकुमार यांनी सर्व स्टाफ सदस्यांना भ्रष्टाचार न करण्याची शपथ दिली आणि समाजात भ्रष्टाचार मुक्त भारत साठी जन जागृती करण्यासाठी मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाला बीओआय रायगड विभागाचे विभागीय प्रबंधक मुकेश कुमार, उपविभागीय प्रबंधक बिरेन चॅटर्जी आणि जिला अग्रणी प्रबंधक विजय कुलकर्णी, तसेच झोनल ऑफिसचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. बँक ऑफ इंडिया रायगड विभागीय कार्यालयतर्फे दिनांक २८ ऑक्टोंबर २०२४ ते ३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत दक्षता जनजागृती सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत बँके तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत रत्न सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त दरवर्षी केंद्रीय दक्षता आयोगाच्या सूचनेनुसार, २८ ऑक्टोंबर २०२४ ते ३ नोव्हेंबर २०२४ या कालावधी मध्ये दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जातो. “राष्ट्राच्या समृद्धीसाठी अखंडतेची संस्कृती” “सत्यनिष्ठा की संस्कृति से राष्ट्र की समृद्धि” या अंतर्गत सोमवार २८ ऑक्टोंबर २०२४ रोजी बँक ऑफ इंडिया रायगड विभागा मधील सर्व कर्मचाऱ्यांनी सचोटीची शपथ घेतली.त्याच बरोबर रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि दक्षता जनजागृति वर चांगले घोष वाक्य स्पर्धा घेण्यात आली. आणि मंगळवार, २९ ऑक्टोंबर २०२४ रोजी दक्षता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, ही रॅली बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय ते अलिबाग समुद्र किनारा पर्यंत रॅली काढण्यात आली, त्यानंतर अलिबाग समुद्र किनारी मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले. 0000

निवडणूकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण आयटी ॲप्लिकेशन्स – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : विधानसभा निवडणुकीत विविध विषयांची प्रभावी अंमलबजावणी करता यावी व त्यावर नियंत्रण ठेवता यावे या हेतूने भारत निवडणूक आयोगाने आयटी ॲप्लिकेशन्स विकसित केले आहेत. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. सी. व्हीजिल आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त होणा-या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी निवडणूक आयोगाने सी व्हिजिल lहे मोबाईल ॲप विकसित केले आहे. यामध्ये दक्ष नागरिकाला एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे सदर ॲपमध्ये छायाचित्र अथवा व्हीडीओ काढून तक्रार नोंदविता येणार आहे व त्यावर जिल्हा प्रशासन तसेच मुख्य निवडणूक कार्यालयाकडून तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे.पात्र दिव्यांगांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हील चेअरची मागणी नोंदविणे इ. सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी हे आयटी ॲप्लिकेशन्स उपलब्ध करुन देण्यात आले आहे. केवायसी Know Your Candidate App मतदारांना त्यांच्या उमेदवाराबाबतचा तपशील त्यामध्ये त्यांच्या नावे असलेले गुन्ह्यांचा तपशील, उमेदवाराची माहिती, इ. माहिती पाहता येऊ शकते. ईएसएमएस ॲप निवडणूक अधिक मुक्त व निष्पक्ष वातावरणामध्ये व्हावी यासाठी आचारसंहितेच्या कालावधीत राज्यातील विविध केंद्रशासनाच्या व राज्यशासनाच्या अंमलबजावणी यंत्रणांकडून बेकायदेशीर पैसा, दारु, अंमली पदार्थ व भेटवस्तू, मौल्यवान धातू, इ. गोष्टी जप्त करण्यात येणार आहे. या जप्तीची माहिती भारत निवडणूक आयोगास दरदिवशी ईएसएमएस अॅप/ पोर्टल वरुन कळविण्यात येत आहे. 00000

आदिवासी मुलांनी कंदील बनवून केली दिवाळी साजरी

ठाणे : ठाण्यातील पाचवड गावांमधील आदिवासी मुलांनी दिवाळी एका अनोख्या पद्धतीने साजरी केली. गेली पाच वर्ष दिवाळीच्या सुट्टीमध्ये आकाश कंदील बनवून आणि त्याची विक्री करून या गावांमध्ये दिवाळी साजरी होते.…

नवी मुंबईकर रंगले हास्य संध्येत

नवी मुंबई, ता. ३१ (वार्ताहर) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणाला रंग चढू लागला असताना केजागर्ती अर्थात कोण जागे आहे? असे विचारून जागे करण्याची वेळ आली आहे. हाच धागा पकडून…

 ‘माझे विरोधक स्वर्गवासी झाले, एकही जिवंत नाही’

 गणेश नाईकांच्या विधानानंतर शिंदे गट आक्रमक   नवी मुंबई : नवी मुंबईत आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यात गणेश नाईक यांना आजवर यश आले होते. मात्र आता त्यांच्या राजकारणाला शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून आव्हान देण्यात येत आहे. भाजपाने गणेश नाईक यांना नवी मुंबईच्या ऐरोली विधानसभेतून उमेदवारी दिली असली तरी शिवसेना शिंदे गटाने मात्र उमेदवारीला विरोध केल आहे. नवी मुंबईत कोणत्याही परिस्थितीत गणेश नाईक नको असा धोशा लावत त्यांच्याविरोधात सर्वपक्षीय मोट बांधण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या विरोधकांची ऐरोली विधानसभा मतदारसंघात मोठी कोंडी झाल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे गणेश नाईक यांनीही आक्रमक पवित्रा घेत विरोधकांना उत्तर देताना माझे सर्व विरोधक स्वर्गस्थ झाले, असे म्हटले. आता त्यांच्या या विधानावर वाद निर्माण झाला आहे. गणेश नाईक काय म्हणाले? “मागच्या वेळेला मी गाफील होतो. १९९९ ला मला फसवून हरवलं गेलं, हे सर्वांना माहीत आहे. पहिल्या फेरीत मला ७५०० मतांचे लीड मिळाले होते. माझ्या विरोधात कट रचणारे सर्व लोक स्वर्गस्थ झाले, एकही जिवंत उरला नाही. मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलायचं नसतं. परमेश्वराला सांगतो की, त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळण्यासाठी तुझ्याबरोबर त्यांना ठेव”, असे विधान भाजपाचे नेते गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना केले. शिवसेना शिंदे गटाकडून विरोध गणेश नाईक यांच्या विधानानंतर नवी मुंबईतील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विजय चौगुले यांनी म्हटले की, गणेश नाईक यांनी आनंद दिघे यांच्याबद्दल सदर विधान काढले आहेत. तसेच वसंत डावखरे यांचाही उल्लेख गणेश नाईकांच्या त्या विधानात आहे. आनंद दिघे साहेबांचे फोटो लावून आम्ही मत मागतो. आनंद दिघे हे आमच्यासाठी दैवतासमान आहेत. जर गणेश नाईक यांना इतका माज आला असेल तर त्यांच्या विरोधात आम्ही ऐरोलीमधील बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याशेजारी जाहीर निषेध आंदोलन करू. नवी मुंबईत राजकीय संघर्ष नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ऐरोली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना जेमतेम नऊ हजारांचे मताधिक्य मिळाले. बेलापूरच्या तुलनेत ऐरोली हा झोपडपट्टी, सिडकोची लहान घरे, माथाडी वसाहती, दाटीवाटीने वसलेल्या गावांचा मिळून बनलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात दलीत, मुस्लिम, मराठी असा मतदारांचे प्रमाण बेलापूरच्या तुलनेत अधिक आहे. गणेश नाईक यांनी या मतदारसंघातून पाच वर्षांपुर्वी ८२ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला खरा मात्र त्यावेळी त्यांना बऱ्यापैकी एकसंघ शिवसेनेची साथ मिळाली होती. नाईकांनीही त्यावेळी प्रचारात शिवसेनेचे स्थानिक नेत्यांना सोबत घेतले होते. मागील पाच वर्षात मात्र नाईक आणि त्यांच्या विरोधकांमधील दरी वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि नाईक यांच्यात विस्तवही जात नाही. याचे परिणाम येत्या निवडणुकीत काय दिसतात? याची आता चर्चा होत आहे. ००००

विद्यार्थ्यांकडून कुटूंबांपर्यंत पर्यावरण रक्षणाचा संदेश

पनवेल –  महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडून प्रत्येक कुटूंबांपर्यंत पर्यावरण रक्षणासाठी पालिकेने अनेक पाऊले उचलली आहेत. यंदाची दिवाळी पर्यावरणपूरक साजरी प्रत्येक कुटूंबांमध्ये साजरी करावी यासाठी महापालिकेने विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी माझी वसुंधरा ५.० या योजनेअंतर्गत पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच कामोठे येथील रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम  विद्यालयातील विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी मुलांनी काय करावे असे विविध पर्याय मुलांना सूचविण्यात आले. तसेच पर्यावरण विषयावर विद्यार्थ्यांमध्ये रांगोळी स्पर्धा व पर्यावरणपूरक आकाश कंदिल बनविण्याच्या स्पर्धा घेण्यात आली. यावेळी रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवाळीच्या दरम्यान फटाके उडवल्याने मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणाचे  प्रमाण वाढते. त्यामुळे श्वसनदाह आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या सूचनेनूसार हरित सण अंतर्गत फटाकेमुक्त दिवाळी, प्रदूषण मुक्त दिवाळी विद्यार्थ्यांनी साजरी करावी यादृष्टीने ही जनजागृती पालिकेने केली आहे. विद्यार्थ्यांनी पुनर्वापर करण्यात येणाऱ्या वस्तू पासून पर्यावरणपूरक आकाश कंदिल बनवून दाखवले.

दिवाळी पहाट निमित्त ठाण्यात तरूणाईचा जल्लोष

डिजेच्या तालावर तरूणाई थिरकली   ठाणे : दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळपासून शहरातील राम मारूती  रोड परिसर, मासुंदा तलाव परिसर, गडकरी चौक तरूणाईच्या उत्साहाने फुलुन गेला होता. डिजेच्या तालावर तरूणाईने ठेका धरत दिवाळी पहाट साजरी केली. पारंपारिक पोशाखात तरूण, तरूणी मासुंदा तलाव परिसरात छायाचित्र काढत दिवाळीच्या शुभेच्छा देत असल्याचे चित्र दिसून आले. तसेच अनेक गायकांनी, ब्रास बँड पथकांच्या गाण्यांनी आजची दिवाळी पहाट रंगली. दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्दशीला ठाण्यात अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सात वाजल्यापासून हे कार्यक्रम सुरू झाले. थोड्यावेळाने तरूण तरूणींचे समूह मासुंदा तलाव, गडकरी चौक, राम मारूती रोड परिसरात दाखल होण्यास सुरूवात झाली. तरूण- तरुणी पारंपारिक साडी, कुर्ता परिधान करून दिवाळी पहाट कार्यक्रमास उपस्थित होते. अनेकजण मित्रमैत्रिणींसोबत सेल्फी काढण्यात रमून गेले होते. डिजेच्या तालावर ठेका धरत सर्वांनी दिवाळी पहाट जल्लोषात साजरी केली. चिंतामणी चौकात राॅकस्टार क्विन पल्लवी दाभोळकर, गायक स्वप्निल गोडबोले, तसेच राम मारूती रोड परिसरात बाळकुम येथील राष्ट्रीय ब्रास बॅंडची पथकांचे वादन आयोजित केले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पहाटसाठी कपड्यांमध्ये वैविध्य दिसून आले. यंदा महिलांमध्ये घरारा ड्रेस, भरजरी ओढण्यांचा ड्रेस तसेच दक्षिण भारतीय पद्धतीच्या घागरा साडीचा प्रकाराला महिलांची सर्वाधिक पसंती होती. यंदाच्या दिवाळी पहाटला पुरुष विविध नक्षीदार कुर्त्यांमध्ये दिसून आले. डिजेवर महाराष्ट्र माझा, जय श्रीराम अशी गाणी वाजत होती. तसेच अनेक ठिकाणी राजकीय  गामी देखिल वाजत असल्याचे चित्र ठाण्यात दिसून आले. या गाण्यांवर तरूणाईने ठेका धरत दिवाळी पहाट साजरी केली. रतन टाटांना श्रद्धांजली भारतीय उद्योग जगताला आधुनिक युगात नेण्याकरिता सतत कार्यरत असणारे, या क्षेत्राचा आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवणारे टाटा उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना श्रद्धांजली देण्यासाठी अनेक ठिकाणी फलक लावण्यात आले होते.

स्थानिक संस्था कर कार्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम

ठाणे : 148 ठाणे विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच स्थानिक संस्था कर कार्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम पार पडला. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. या विधानसभा निवडणुकीत मतदान करून आपली लोकशाही बळकट करायला हवी. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे आपण मतदानाचा अधिकार बजवायला हवा, असे आवाहान स्वीप टीम कडून करण्यात आले. या वेळी स्थानिक संस्था कार्यालयात 50 हून अधिक कर्मचारी उपस्थित होते.या कर्मचारी वर्गाला लोकशाहीत मतदानाला किती महत्व आहे व मतदान का करावे? याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या मतदान जनजगृती कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना “मी मतदान करणारंच… आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा” या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान 20 नोव्हेंबर 2024 असे दर्शविणारे माहितीपत्रकाचे ही वाटप करण्यात आले. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी देशाच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता 20 नोव्हेंबर 2024 रोजी अवश्य मतदान करावे, असे आवाहान सर्व कर्मचारी वर्गाला करण्यात आले. सर्व कर्मचाऱ्यांनी मतदानाची सामूहिक शपथ घेऊन मतदान जनजागृती अभियानाच्या कार्यक्रमाची सांगता केली.

 नवमतदारांनी व नागरिकांनी मतदानाचा केला संकल्प

 ठाण्यातील “दिवाळी पहाट” कार्यक्रमात ठाणे : दिवाळीत जसे प्रत्येक घरात दीपप्रज्वलन केले जाते, तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या मताचा दीप लोकशाहीच्या निवडणूकरुपी उत्सवात लावावा. त्यातून देशाचे भवितव्य अधिक उज्ज्वल, पारदर्शक आणि न्याय होईल, असा संदेश देत तलावपाळी येथे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात मतदारांनी मतदान करण्याचा संकल्प केला आणि शपथ घेतली. तलावपाळी परिसर येथे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात 148 ठाणे विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. भारतीय राज्यघटनेने मला मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. त्याचा कोणत्याही परिस्थिती वापर करेन. मतदान करून उमेदवार निवडणे माझी राष्ट्रीय जबाबदारी आहे. देशहिताकरिता जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकणाऱ्या सर्वोत्तम उमेदवाराची निवड करण्यासाठी माझ्या कुटुंबातील सदस्यांना, परिचितांना मतदान करण्यासाठी प्रेरित व प्रोत्साहीत करीन. कोणतीही भीती वा लालसोपोटी मतदान करणार नाही, असा संकल्प उपस्थित सर्व मतदारांनी केला. युवा वर्गाने वेशभूषाच्या माध्यमातून “राष्ट्राच्या हितासाठी करायचं मतदान.., एकतेने एकजुटीने गाजवूया मैदान.., लोकशाहीचा करूया सन्मान.., 100 टक्के करायचं मतदान…” अशी आगळीवेगळी वेशभूषा मतदार जागृती सर्वाचे लक्ष वेधून घेत होती. नवमतदार तरुणाईला, मतदानाचा हक्क न बजावणाऱ्या मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून मतदार जागृती केली जात होती. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. याचा वापर योग्य पद्धतीने करण्याची जबाबदारी प्रत्येक मतदाराची आहे. कोणत्याही अमिषाला बळी न पडता योग्य उमेदवारास मत देऊन आपले शहर, राज्य आणि देशाच्या विकासात हातभार लावावा आणि दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी प्रत्येकाने आपले राष्ट्रीय कर्तव्य बजवावे, असे आवाहन स्वीप टीमकडून मतदारांना केले जात आहे. 00000

 सी-व्हिजिल ॲपवरील तक्रारींचे जलदगतीने निराकरण

306 तक्रारींचे निराकरण शंभर मिनिटांच्या आत   ठाणे : निवडणुकीच्या दरम्यान काही अनियमितता किँवा आचारसंहिता भंगाविषयी काही बाबी आढळून आल्यास नागरिकांना “सी व्हिजिल” या ॲप्लिकेशनच्या माध्मातून संदेश, फोटो, व्हिडिओ व्दारे ऑनलाईन तक्रार  दाखल करू शकतात. या ॲपवर तक्रार प्राप्त झाल्यापासून 100 मिनिटांच्या आत तक्रारीचे निवारण केले जाते. या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात दि.31 ऑक्टोबर 2024 दुपारी 3:30 वाजेपर्यंत 348 तक्रारी प्राप्त झाल्या. या 348 तक्रारींमध्ये एकूण 324 तक्रारी दखलपात्र असून उर्वरित 24 तक्रारी अदखलपात्र आहेत. या 324 दखलपात्र तक्रारींमधून 306 तक्रारींचे 100 मिनिटाच्या आत निराकरण करण्यात आले असून उर्वरित तक्रारींचेही निराकरण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती सी-व्हिजिल कक्षाचे जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी श्री.विजयसिंह देशमुख व सहाय्यक समन्वय अधिकारी श्रीमती सुकेशिनी पगारे यांनी दिली आहे. 00000