Month: October 2024

 शाळा संचालक आणि सचिवांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणी ठाणे : बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणात शाळेचे संचालक आणि सचिव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. अटपूर्व जामीन मिळावा म्हणून शाळा संचालक आणि सचिवांनी याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळण्यात आली आहे. दोघांना अटकेपासून दिलासा देण्याचे हे प्रकरण नाही अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे. बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन चिमुरड्या मुलींवर अक्षय शिंदे याने अत्याचार केला होता. वैद्यकीय तपासणीनंतर अत्याचार झाल्याचे उघड झालं होतं. त्यानंतर दोन्ही मुलींच्या पालकांनी सुरुवातीला शाळा प्रशासन आणि नंतर पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली. शाळा प्रशासनाने या घटनेकडे दुर्लक्ष करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हा गुन्हा दाखल करत असताना दिरंगाई केली. त्याविरुद्ध बदलापुरात संताप व्यक्त होत होता. २० ऑगस्ट रोजी बदलापुरात नागरिकांचे उग्र आणि उत्स्फूर्त असे आंदोलन झाले. जनक्षोभ उसळलेला पाहण्यास मिळाला. ००००००

 वर्तकनगरच्या तिरुपती बालाजी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव – राजेंद्र फाटक

 सन्मान युवा प्रतिष्ठानचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष, एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती   ठाणे : शहरातील वर्तकनगरच्या पावन नगरीत यंदा शारदीय नवरात्रोत्सवासाठी तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा साकारण्यात येत आहे. सन्मान युवा प्रतिष्ठानचे संस्थापक आयोजक राजेंद्र फाटक व शिवसेनेच्या माजी नगरसेविका राधिका फाटक यांच्या सौजन्याने होत असलेल्या या नवरात्रौत्सवात यंदा तिरुपती बालाजी मंदिराच्या देखाव्यात प्रभु श्री रामाची, बालाजीची मूर्तीच्या मधोमध देवी  अंबे माँ विराजमान होणार आहे. त्यामुळे, भाविकांना भक्तिचा त्रिवेणी संगम अनुभवता येणार आहे. सन्मान युवा प्रतिष्ठानचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असुन या नवरात्रौत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती आयोजक राजेंद्र फाटक व राधिका फाटक यांनी दिली. याप्रसंगी शिवसेना सचिव अभिनेता सुशांत शेलार, उपविभाग प्रमुख समिर उरणकर, शाखाप्रमुख अनिल भोईर आदी जण उपस्थित होते. ठाण्यातील वर्तकनगर येथील दत्तमंदिर जवळील ठा.म.पा. शाळा क्रमांक ४४ च्या पटांगणात सन्मान युवा प्रतिष्ठानच्यावतीने गेली २४ वर्षे सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा केला जातो. यंदा २५ वे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने आंध्र प्रदेशातील श्री तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृतीचा प्रेक्षणीय देखावा पाच हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये ४० बाय ६० फुटांच्या आकारात साकारण्यात येत आहे. दररोज ब्राम्हणांच्या साक्षीने होम हवन विधी करण्यात येणार आहे. यावर्षी सुशांत शेलार प्रस्तुत सन्मान दांडीयाचे आयोजन करण्यात आले असून अक्षया आयर, सावनी रवींद्र, आनंदी जोशी, रोहित राऊत, पद्मनाभ गायकवाड, आदिश तेलंग, मयूर सुकीळे, राहूल मुखर्जी आदी अनेक मराठी कलाकार दांडियामध्ये सहभागी होणार आहेत. या नवरात्र उत्सवात शेवटचे दोन दिवस फॅन्सी ड्रेस स्पर्धा तर दररोज रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फाटक यांनी दिली. या उत्सवात लाडक्या बहिणींसाठी खेळ रंगला पैठणीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला चार चांद लावण्यासाठी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी उपस्थित राहणार असून मंगळवारी ८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती आयोजक राजेंद्र फाटक व राधिका फाटक यांनी दिली. 00000

आता समाजाने मोठी स्वप्न बघण्याची वेळ आली आहे – निलेश सांबरे

 जिजाऊनगरीत  कुणबी समाज भूषण पुरस्कार २०२४ सोहळा संपन्न अनिल ठाणेकर   ठाणे : आपली झेप गल्ली पासून दिल्ली पर्यंत आता न थांबता आपली भरारी ही आता जागतिक असली पाहिजे  . अगदी ग्रामसेवक ते पंतप्रधान कार्यालयाची धुरा सांभाळणारी व्यक्तीही आपली असली पाहिजे तसेच आतंरराष्ट्रीय कंपण्याचे अध्यक्ष आपले असले पाहिजे. आपण मोठी स्वप्ने का नाही पाह्यची ? असे उद्गार जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी विक्रमगड येथील जिजाऊनगरीनाध्ये आयोजित करण्यात आलेल्या कुणबी समाज भूषण पुरस्कार सोहळ्यात काढले. याप्रसंगी सुभाष पवार – जिल्हा परिषद उपाध्यक्ष,अशोक वालम-कुणबी एकीकरण समिती अध्यक्ष,रोहिणी शेलार- सभापती महिला व बालकल्याण पालघर जिल्हा, मारुती धीर्डे- शिवसेना जिल्हा प्रमुख , मोनिका मोहन पानवे- भिवंडी लोकसभा प्रमुख, ॲड..महेंद्र माडवकर, दत्ता ठाकरे,प्रकाश भांगरथ, रवी चंदे आदिजण उपस्थित होते .या कार्यक्रमासाठी ठाणे पालघरच नाही तर संपुर्ण कोकणातुन मोठ्या संख्येने कुणबी समाज आणि समाजातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. कुणबी समाज हा शेतात घाम गाळणारा, वेळ आल्यावर देशासाठी रक्त सांडणारा म्हणून आपली ओळख आहे. आपली परंपरा आणि सांस्कृतिक ओळख जपत या समाजाने महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात आपला वेगळा असा ठसा उमटवला आहे. म्हणूनच त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी आणि समाजाच्या एकत्रिकरणासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे निलेश सांबरे यांनी सांगितले. पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील जिजाऊनगरी  या ठिकाणी जिजाऊ संघटना व कुणबी एकीकरण समितीच्या वतीने कुणबी समाज भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कोकणातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या कुणबी समाजातील  मान्यवरांचा  सन्मान करण्यासाठी “कुणबी समाज भूषण पुरस्कार 2024” हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उल्लेखनीय व्यक्तिमत्वांना सन्मानचिन्ह देत त्यांना  सन्मानित करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना सांबरे म्हणाले की लोकसभा निवडणुकीत जरी पराभाव झाला असला तरी त्या पराभवातूनही आपली ताकत किती हे आपल्याला कळाले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत माझ्यासोबत असलेल्या आपल्या सर्व समाजाने तहान भूक विसरून माझा प्रचार केला आहे. मात्र संघटन कमी पडल्याने आपल्याला हार पत्करावी लागली. कुणबी समाज हा अर्थव्यवस्थेचा मूळ कणा आहे. शेतात घाम गाळून देशाची भूक मिटवणारा हा समाज आहे. हा समाज मजबूत व संघटीत असणे फक्त तुमची आमची गरज नाही तर राष्ट्राच्या समृद्धी साठी हे गरजेचे आहे. त्यामुळे आता काळाची पावले ओळखून कुठल्याही समाजाला कमी न लेखता आपल्याला सर्वांना सोबत घेऊन संघटीत व्हायचे आहे. असे आवाहन सांबरे यांनी उपस्थितांना यावेळी केले. विक्रमगड तालुक्यातील झडपोली या ठिकाणी  जिजाऊ संघटनेच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या कुणबी समाज भूषण पुरस्कार सोहळ्यात कोकणातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या कुणबी समाजातील  मान्यवरांचा  सन्मान करण्यासाठी “कुणबी समाज भूषण पुरस्कार 2024” हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उल्लेखनीय व्यक्तिमत्वांना सन्मानचिन्ह देत त्यांना  सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात कुणबी समाजातील विविध क्षेत्रात विशेष लौकीक प्राप्त केलेल्या एकूण २५० व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. कुणबी समाजातल्या ज्या ज्या समाजबांधवांनी समाजाला प्रेरणादायी ठरेल असे काम केले अश्या समाजबांधवांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन भविष्यात समाजातल्या इतर नवतरुण युवकांनी त्यांचा वारसा पुढे चालवावा यासाठी हा जो सोहळा आयोजित केला आहे त्यासाठी आयोजकांचे मनापसून कौतुक आहे असे सांगत माजी आमदार गोटीराम पवार यांचे सुपुत्र आणि ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संस्थेच्या उपक्रमांचे देखील कौतुक केले. निलेश सांबरे यांचे कार्य हे समाजाने प्रेरणा घ्यावी असेच आहे. कुठलेही राजकीय पद आणि सत्ता हातात नसतानाही  सांबरे यांचे चालू असलेले काम हे मोठ मोठ्या सत्ताधा-र्यांना देखील शक्य होत नाही. असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.यावेळी लोकसभेच्या निवडणुकीतल्या पराभवावर बोलताना जिजाऊ संघटनेचे  अध्यक्ष निलेश सांबरे म्हणाले की मोठ मोठे युती असलेले बलाढ्य प्रस्थापित पक्ष आपल्या समोर लढतीत उभे असतानाही आपल्याला मिळालेल्या मतांचा टक्का हा खूप प्रभावी होता. त्यामुळे ही आपली हार नसून जितच आहे. आता आपल्या समाजाने मोठी स्वप्न बघण्याची वेळ आली आहे.  मात्र कुठल्याही समाजाला न दुखवता आपल्याला आपला समाज घेऊन पुढे जायचे आहे असे प्रतिपादन सांबरे यांनी यावेळी केले. समाजातील विद्यार्थ्यांनी तालुका स्तरापासून मुख्य न्यायाधीशापर्यंत तसेच  इस्रो (ISRO) पासून मोठ मोठ्या इंटरनॅशनल कंपन्यांनमध्ये आपले युवक युवती दिसले पाहिजेत. मोठ मोठे डॉक्टर ते वैज्ञानिकापर्यंत आपल्या समजातली युवापिढी दिसली पाहीजे. तर उद्योगधंद्यांकडे देखील आपल्या युवकांनी आता वळायाला हवे अदानी आणि अंबानीच्या पुढे आपले लोक गेले पाहिजेत . निवडणुका आणि त्यातून मिळणारी सत्ता हे पैसे कमावण्याचे माध्यम नसून  यातून १० टक्के राजकारण आणि ९० टक्के समाजकारण झाले पाहिजे असे मत यावेळी सांबरे यांनी यावेळी व्यक्त केले. ००००

जागतिक हृदय दिनानिमित्त देणगीदार व हृदयरूग्ण बालकांचा कृतज्ञता सोहळा संपन्न

ठाणे : जागतिक  हृदय  दिनानिमीत्ताने रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रिमियम व ज्युपिटर हॉस्पीटल फाऊंडेशन यांच्या वतीने ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पीटलमध्ये देणगीदार व  हृदयावर उपचार घेतलेले बालक व त्यांचे पालक यांचा कृतज्ञता सोहळा संपन्न झाला.…

‘सिमांकन व हस्तांतरण करून शेतकऱ्यांना योग्य प्रकारे भूखंडाचे वाटप करा’

प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे मागणी   पनवेल : सिडको अंतर्गत नैना परिक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या भूखंडांचे तातडीने सिमांकन व हस्तांतरण करून त्यांना नियमानुसार योग्य प्रकारे भूखंडाचे वाटप करावे, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना लेखी स्वरूपात निवेदन दिले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, नैना प्रशासनाने सध्या मोठ्या प्रमाणावर नैना परिक्षेत्रात विकासकामांचे प्रयोजन केले असून त्या सर्व विकासकामांना सुरूवात तातडीने करावयाचे ठरले असल्याबाबत माहिती मिळत आहे. विकासकामे होणे हे अतिशय योग्यच आहे, परंतू तत्पूर्वी ज्या क्षेत्रात ही विकासकामे नैना प्राधिकरणाने प्रस्तावित केली आहेत, त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. या क्षेत्रांतील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी नैना प्राधिकरणाने घेतल्या आहेत, त्यांना नियमानुसार त्यांच्या वाट्यांस येणाऱ्या भूखंडांचे योग्य पध्दतीने वाटप होणे गरजेचे आहे. येथील अनेक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या भूखंडाचे अद्याप सिमांकन (Demarcation), हस्तांतरण (Transfer) झालेले नाही. त्याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार सांगूनसुध्दा प्रशासन सदर गोष्टी गांभीयनि घेत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या जागेबाबत अनेकजणांच्या हरकती व नाराजी आहे, त्यांची योग्य प्रकारे दखल न घेताच नैना प्राधिकरणाने विकासकामे प्रस्तावित केली आहेत. विकासकामे ही गरजेचीच आहेत, परंतु ती स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच झाली पाहिजेत, मात्र  तसे न झाल्याने त्याबाबत स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष आहे व या असंतोषाचा कधीही उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बाबींचा तातडीने विचार करून, सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या जमिनी, भूखंडाबाबत समस्यांचा त्वरित निपटारा करून नंतरच या विकास कामांची सुरुवात करावी, जेणेकरून शेतकऱ्यांचा असंतोष कमी होईल व योग्य प्रकारे कामे मागीं लागतील, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले असून अन्यथा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूने सिडको नैना प्रशासनाविरोधात कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोला दिला आहे. 0000000

 राष्ट्रीय लोकअदालतीत दीड अब्जांची तडजोड

 न्यायाच्या प्रतीक्षेतील ९५० दाव्यांचा निकाल   ठाणे : लोकअदालतीच्या माध्यमातून ठाणे आणि पालघर न्यायालयावरील ३१,१२५ दाव्यांचा मोठा भार कमी झाला. त्याचबरोबर तब्बल एक अब्ज ५९ कोटी ६७ लाख १९ हजार ४३० रुपयांची भरपाई पक्षकारांना मिळवून देण्यात यश आले आहे. इतकेच नव्हे तर वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले ९५० दावेदेखील निकाली काढून पक्षकारांना न्याय मिळवून देण्यात आला आहे. या दाव्यांमध्ये ३० वर्षे जुन्या प्रकरणांचाही समावेश होता. ठाणे जिल्ह्याचे प्रमुख सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे न्यायालयाने ही मोलाची कामगिरी केली. न्यायालयाची पायरी चढण्यासाठी अनेकांकडून टाळले जाते. न्यायालयात चालणारी धीमी प्रक्रिया आणि खर्चिक बाब याला कारणीभूत होती, परंतु आता सर्वसामान्यांचा न्यायालयाच्या कामकाजावरील विश्वास वाढू लागला आहे. आता सर्वसामान्यांनाही विनाखर्च आणि विनाविलंब झटपट न्याय मिळू लागला आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य विधी सेवा प्राधिकरणाने जिल्हा जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक चार महिन्यांनी अशा प्रकारची लोक अदालत भरवून त्यात पक्षकारांच्या आपसातील तडजोडीतून प्रलंबित आणि दाखल पूर्व दावे निकाली काढले जातात. ठाणे आणि पालघर न्यायालयात नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठ्या प्रमाणात दावे निकाली काढून  न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना न्याय मिळवून देण्यात आला. मागील ३०, २० आणि १० वर्षांपासून न्यायाची प्रतीक्षा असलेल्या दाव्यांनाही न्याय देण्यात आला. या प्रकारचे ९५० दावे तडजोडीतून निकाली काढून पक्षकार आणि न्यायालयाचा अमोल वेळ बचत केला आहे, तर अनेक वर्षांपासून हे दावे रखडलेले असल्यामुळे पक्षकरांना वारंवार न्यायासाठी न्यायालयाच्या पायऱ्या चढाव्या लागतात, परंतु राष्ट्रीय लोकअदालतीत त्यांची समाधानकारक सोडवणूक करण्यात आल्यामुळे आता या पक्षकारांना न्यायालयात यावे लागणार नाही. मोटार अपघात प्रकरणांतदेखील लोकअदालतीत अतिशय समाधानकारक निर्णय झाला. अशा दाव्यांपैकी एका प्रकरणात ४.५० कोटींची तडजोड करून मयताच्या वारसाला मोठी मदत मिळवून दिली, तर जिल्ह्यातील २१७ अपघात प्रकरणे निकाली काढून पीडितांना २६ कोटी ८० लाख ४९ हजार ७२२ रुपयांची मदत मिळवून दिली. राष्ट्रीय लोकअदालतीत व्हिडिओ काॅन्फरन्स यांसारख्या इलेक्ट्राॅनिक साधनांचा मोठ्या प्रमाणत वापर करून अनेक प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड करण्यात आली.

 कल्याण ग्रामीणमध्ये उभे राहणार संशोधन केंद्र

 खिडकाळी येथे केमिकल रिसर्च इन्स्टिट्यूटला मंजूरी   डोंबिवली: मुंबई महानगरांचा विकास करताना येथे शैक्षणिक संस्थांची उभारणी करुन हे क्षेत्र रिसर्च हब म्हणून विकसित करण्याचा मानस आहे. यातून ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण भागातील खिडकाळी येथे संशोधन केंद्राची उभारणी केली जाणार आहे. शैक्षणिक वापरासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या संशोधन केंद्र उभारणीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रीमंडळ येथे पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यास मान्यता दिली आहे. यामुळे उपनगर तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात अभ्यास करण्यासाठी मोठे दालन खुले होणार आहे. मुंबई पल्याडची ठाणे, कल्याण ही शहर शैक्षणिक हब म्हणून उदयाला येत आहेत. संशोधन क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी मात्र आजही येथील विद्यार्थ्यांना मुंबई येथील विद्यापीठ, महाविद्यालयांकडे धाव घ्यावी लागते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हा शैक्षणिक प्रवास आणखीनच खडतर होऊन जातो. मुंबई महानगर प्रदेशाचा विकास करताना शैक्षणिक संशोधन संस्थांची उभारणी करुन हे क्षेत्र रिसर्च हब म्हणून विकसित करण्याचा मानस कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठेवला आहे. त्यादृष्टीने, अतिशय मोक्याच्या असलेल्या खिडकाळी परिसरात संशोधन केंद्र व्हावे, यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याविषयी मान्यता देण्यात आली असून खासदार शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. खिडकाळी येथील राज्य शासनाच्या मालकीचा हा भूखंड उच्च व तंत्र शिक्षण विभागास रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई या संस्थेच्या रुपांतरीत संशोधन केंद्र या शैक्षणिक उपक्रमासाठी विनामूल्य हस्तांतरीत करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ही संस्था रसायन तंत्रज्ञान संस्था (ICT) यांच्या मार्फत विकसित करण्यात येणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई या संस्थेस अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे. तर, या संस्थेची शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी पाहून उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या संस्थेला ‘एलिट इन्स्टिट्यूशन’ हा दर्जा दिलेला आहे. या संस्थेची गणना देशातील आयआयटी, आयएससी, आयआयएसइआरएस या निष्णात संस्था बरोबरीने केली जाते. 000000

 शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा शनिवारी ‘महा नोकरी’ मेळावा

 मुंबई पदविधरचे आमदार आणि पक्षाचे नेते ॲड. अनिल परब यांच्या वचनपूर्तीनिमित्त आयोजन   मुंबई : राज्यात महायुती सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात वाढलेल्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर मराठी तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) ‘महा रोजगार’ मेळाव्याचे विलेपार्ले -पूर्व येथे शनिवारी, ५ ऑक्टोबर रोजी आयोजन केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महा रोजगार’ मेळाव्याचे उद्धघाटन होणार असून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची मेळाव्याला प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती मेळाव्याचे संयोजक शिवसेना नेते व मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अनिल परब यांनी मंगळवारी वांद्रे येथील पत्रकार परिषदेत दिली. राज्यात महायुती सरकारच्या काळात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अनेक उद्योग शेजारच्या राज्यात पाठविले गेले. रोजगार निर्माण करण्यात महायुती सरकार पूर्णपणे आपल्याशी ठरली आहे. त्यातच राज्यात रोजगारांची वानवा असतानाच बड्या कंपन्यांनाना महायुतीचे सरकार प्रदूषणाच्या नोटीसा पाठवत आहे. मात्र या नोटीसांचे पुढे काय होते, हे गौडबंगाल आहे, असा आरोप ॲड. अनिल परब यांनी केला. राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार आहे. आमचे सरकार तरुणांना नोकऱ्या देणे व सरकारी रिक्त जागा भरण्याचे काम वेगाने करेल. राज्यातील बेरोजगारीची परिस्थिती हाताळण्यावर आमचे सरकार लक्ष केंद्रित करेल. शेजारील गुजरातमध्ये स्थलांतर होत असलेले उद्योग रोखले जातील, असे ॲड. अनिल परब यांनी स्पष्ट केले. परब यांनी विधान परिषद निवडणुकीत दिलेल्या अशवसानाच्या वचनपूर्तीनिमित्ताने हा महा रोजगार मेळावा आयोजित केला आहे. ह्या मेळाव्यात लॉजिस्टीक, बँकींग, इन्शुरन्स, बीपीओ, हॉस्पिटॅलिटी, फायनान्स, शिक्षण, बांधकाम, माहिती तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्रातील १३० कंपन्या सहभागी होणार आहेत. त्यामध्ये ॲमेझॉन, हिंदुजा, एचडीएफसी, एसबीआय, बजाज, टाटा एआयजी, एअरटेल, आयसीसी लोम्बार्ड अशा नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे. यासंदर्भात माहिती देताना आमदार ॲड. अनिल परब म्हणाले की, या मेळाव्यासाठी १३ हजार युवकांनी नोंदणी केली आहे. सुमारे १६ हजार युवक मेळाव्यात सहभाग घेणे अपेक्षीत असून सुमारे १४ हजार युवकांना या मेळाव्यात रोजगार मिळेल. मेळाव्यासाठी नोंदणी केलेल्या युवकांनी येताना बायोडेटा, केवायसी कागदपत्रे आणि छायाचित्र सोबत आणावे, असे आवाहन आमदार ॲड. परब यांनी केले आहे. ॲड. अनिल परब पुढे म्हणाले की, विधान परिषद मुंबई पदवीधरच्या निवडणुकीच्या जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती म्हणून हा मेळावा होत आहे. यापुढे दरवर्षी महा नोकरी मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. जाहिरनाम्यामध्ये दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती पहिल्या शंभर दिवसात करण्याचे वचन दिले होते, ते वचन आम्ही या मेळाव्याच्या निमित्ताने पूर्ण करत आहोत. जून मध्ये पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ॲड. अनिल परब यांनी मुंबई पदधीर मतदारसंघात भाजपचे उमेदवार किरण शेलार यांचा २६ हजार मतांनी पराभव केला होता. ॲड. अनिल परब हे विधान परिषदेचे शिवसेनेचे गटनेते असून त्यांची विधान परिषद आमदारकीची चौथी टर्म आहे.

6 ऑक्टोबरला नवरात्र उत्सव स्वच्छतेचा ‘स्वच्छता देवीचा’ सत्कार

ठाणे : प्रतिवर्षी ‘स्वच्छता पंधरवडा’ 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत हिंदुस्थानात सर्वत्र साजरा केला जातो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या स्वच्छता मोहीम संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता पंधरवडा साजरा होत आहे,या निमित्ताने महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शना खाली वॉर्ड क्र.14 मध्ये ठाणे महानगर पालिका अंतर्गत स्वभाव स्वच्छता व संस्कार स्वच्छता ही संकल्पना राबविण्यात येणार आहे .यानिमित्ताने तिसऱ्या टप्प्यात “ठाणे बदलते” ही संकल्पना घेऊन “उत्सव स्वच्छतेचा” हा उपक्रम वॉर्ड क्र. 14 मध्ये दिलीप बारटक्के मा. नगरसेवक मा. गटनेते यांचा मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे. या निमित्ताने मंगळवार 1 ऑक्टोबरला सकाळी 6 वा,आई माताजी मंदिर, स्वा. सावरकर नगर येथे सफाई महिला कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला,येणाऱ्या नवरात्री मध्ये रविवार 6 ऑक्टोबर, सायंकाळी 6 वा ‘उत्सव स्वच्छतेचा” या उपक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर नगरातील सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे या सफाई महिला कर्मचारी म्हणजेच “स्वच्छता देवीचा” सत्कार करण्यात येणार आहे. या निमित्ताने भगवा रंग दिवस व महाराष्ट्र डे साजरा होणार आहे.

 ‘विद्यार्थ्यांनी अवकाश निरीक्षण छंद म्हणून नाही तर संशोधन म्हणून हाती घेणे गरजेचे’

ज्येष्ठ शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर यांचे मत   ठाणे : ठाण्यातील किसननगर येथील आदर्श इंग्लिश स्कुलमध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अवकाश निरीक्षण केंद्राचे उदघाट्न संपन्न झाले.  हेंकेल अधेसिव्हज टेक्नॉलॉजिज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (हेंकेल इंडिया ) च्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या अवकाश निरीक्षण केंद्राचे उदघाट्न समारंभी ज्येष्ठ शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर, हेंकेल इंडिया चे मुख्य आर्थिक अधिकारी कृष्ण प्रकाश, मीरा कोर्डे, प्रसाद खंडागळे, आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन मोरे, कार्यकारी विश्वस्त श्रद्धा मोरे, प्राचार्य संतोष गावडे, हेंकेल इंडियाचे सीएसआर सदस्य कुंजल पारेख व संदीप पेटकर आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अवकाश निरीक्षण छंद म्हणून नाही तर संशोधन म्हणून हाती घेणे गरजेचे आहे ज्याद्वारे देशाच्या विकासात आपले योगदान देता येईल” असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर यांनी व्यक्त केले. तसेच आदर्श इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांसोबत इतरही शाळेच्या विद्यार्थ्यांना या केंद्राचा लाभ घेता यावा, असे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. प्रसाद खंडागळे यांनी अवकाश संशोधन क्षेत्रात विद्यार्थ्यांची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध प्रयोग कसे करता येईल याबाबतचे मार्गदर्शन करत असताना यापूर्वी सुरु झालेल्या 12 अवकाश निरीक्षण केंद्रामधील मिळत असलेल्या यशाचा आढावा घेतला. हेंकेल इंडिया विद्यार्थ्यांमध्ये अवकाश संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे मत कृष्ण प्रसाद यांनी व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी हेंकेल इंडियाचे आभार मानत असताना सुरु झालेल्या या अवकाश निरीक्षण केंद्राचा लाभ ठाणे शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना होईल याची हमी दिली. विविध उपक्रमांच्या माध्यमातून ठाणे शहरातील इयत्ता 5 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना या अवकाश निरीक्षण केंद्राची भेट व त्यावर आधारित अभ्यासक्रमासाठी नोंदणी करता येईल असे सांगितले. हेंकेल इंडियाचे संदीप पेटकर व विशाल कुंभार यांनी या केंद्राचे समन्वयक म्हणून काम पाहिले. तसेच ट्रेन दे ट्रेनर या संकल्पनेनुसार शिक्षकांना अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाईल व त्यामध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचता येईल, असे मत व्यक्त केले. 00000