Month: October 2024

 घोडबंदर येथे पहिले सुपर स्पेशालिटी सरकारी कॅशलेस हॉस्पिटल सुरु होणार  – प्रताप सरनाईक

 २५ कोटी विशेष निधी खर्चून ठाणे : सर्व वैद्यकीय उपचार व मोठ्या सर्जरी सरकारी योजनेतून मोफत केल्या जाव्यात यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून मीरा-भाईंदरच्या धर्तीवर घोडबंदर येथील नळपाडा येथे १५० बेडचे सुपर स्पेशालिटी “मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक” या नावाने कॅशलेस रुग्णालयाची उभारणी करण्यात आलेली आहे. यासाठी २५ कोटी विशेष निधी मंजूर करून आणला. त्याचे उदघाटन पुढील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील लोकमान्यनगर, वर्तकनगर, भीमनगर, शिवाई नगर, उपवन, येऊर येथील आदिवासी पाडे, वसंत विहार, घोडबंदर रोड व आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना या कॅशलेस रुग्णालयाचा फायदा घेता येणार आहे. घोडबंदर रोड नळपाडा येथील हॉस्पिटलची इमारत महानगरपालिकेच्या माध्यमातून बनविण्यात आलेली आहे. या इमारतीत हे कॅशलेस हॉस्पिटल ठाणेकर नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करावे असे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठरवले. या हॉस्पिटल इमारतीत सर्व आधुनिक मशिनरी व हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमदार सरनाईक यांनी २५ कोटी विशेष निधी मंजूर करून आणला. या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापन एका सेवाभावी संस्थेला देण्यात आले आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची ज्यांना माहिती आहे अशा संस्थेला हे हॉस्पिटलचे व्यवस्थापन देण्यात आले असून सर्व स्टाफ व हॉस्पिटलचे व्यवस्थापन ही संस्था सरकारच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे सांभाळणार आहे. लाखो रुपये ज्या ऑपरेशन साठी बाहेर लागतात अशा मोठ्या सर्जरी येथे मोफत होण्यास आता सुरुवात होणार आहे. गरजूंना औषधेही मोफत देणार आहेत. २४ तास हॉस्पिटल गरजूना सेवा देणार आहे.  हे कॅशलेस हॉस्पिटल असल्याने पेशंटच्या साध्या तपासणी पासून, विविध टेस्ट करणे आणि डॉक्टरांचे कन्सल्टिंग, पुढे आवश्यक असल्यास ऑपरेशन, त्यानंतर पुन्हा पुढील सर्व उपचार अशा सर्व आरोग्य सुविधा मोफत मिळणार आहेत. हे हॉस्पिटल म्हणजे गरीब – गरजू रुग्णांसाठी एक वरदान ठरणार आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. ठाणे शहरातील हे हॉस्पिटल लोकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. ठाणे शहरातील दुसरे तर महाराष्ट्र राज्यातील तिसरे सरकारी कॅशलेस हॉस्पिटल आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत हे कॅशलेस हॉस्पिटल चालणार आहे. राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सर्व उपचार, कार्डिओलॉजी, अँजिओप्लास्टी, बायपास हृदय शस्त्रक्रिया, ब्लॉक बदलणे, पेसमेकर बसविणे अशा मोठ्या शस्त्रक्रिया, कॅन्सरवरील उपचार त्याचप्रमाणे इस्पितळात रक्त तपासणी, हेमेटोलॉजी, बायोकॅमिस्ट्री चाचणी, ईसीजी, सोनोग्राफी, २ डी इको, होल्टर, पीएफटी, एक्स-रे, कॅट्सकॅन, सीटी स्कॅन स्क्रिनिंग, यूरो शस्त्रक्रिया, न्यूरो सर्जरी जसे की कॅनिओटॉमी, हेमॅटोमा इव्हॅक्युएशन, स्पाइन सर्जरी, लॅमिनेक्टॉमी, स्त्रीरोग शस्त्रक्रिया जसे की हिस्टेरेक्टॉमी, डोके आणि मानेचा कर्करोग, स्त्रीरोग कर्करोग, पोटाचा कर्करोग इ. सारख्या ऑन्को शस्त्रक्रिया येथे होणार असून या सुविधा विनामूल्य (कॅशलेस) स्वरूपात पिवळ्या, केशरी तसेच शुभ्र शिधापत्रिका धारकांसाठी येथे सरकारी योजनेंतर्गत उपलब्ध होणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले योजनेमधून होणारी वैद्यकीय मदत दिड लाखापासून पाच लाखापर्यंत नेण्यात आल्यामुळे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील या दोन्ही हॉस्पिटलच्या उभारणीसाठी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू न दिल्याने नळपाडा येथील हॉस्पिटल बांधून पूर्ण होत आहे. ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील लोकमान्यनगर, वर्तकनगर, भीमनगर, शिवाई नगर, उपवन, येऊर येथील आदिवासी पाडे, वसंत विहार, तसेच घोडबंदर रोड व आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी आवाहन केले.

येऊर येथील गोशाळेत युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी केले गोमातेचे विधिवत पूजन

अनिल ठाणेकर   ठाणे : आमदार प्रताप सरनाईक यांच्यावतीने भागवत सत्संग सनातन राष्ट्रसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रसंमेलनाचा समारोप करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देशी गायीला राज्यमाता – गोमाता म्हणून मान्यता देण्यात आल्याचा व देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना लागू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. याचे औचित्य साधून मंगळवारी येऊर येथील गोशाळेला युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी भेट दिली. या ठिकाणी ब्राह्मणांच्या उपस्थितीत गोमातेची विधिवत पूजा पुर्वेश सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी युवासेना ठाणे लोकसभा अध्यक्ष विराज निकम व नितीन लांडगे, युवासेना पालघर निरिक्षक सिद्धार्थ पांडे, ठाणे जिल्हा सचिव अभिषेक शिंदे, जिल्हा समन्वयक अर्जुन डाबी, विधानसभा निरिक्षक किरण जाधव, ओवळा माजिवडा विधानसभा अध्यक्ष देवेंद्र साळवी, युवासेना ठाणे विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता, विधानसभा उपाध्यक्ष विकेश भोईर, अशफाक शेख, अमित यादव, राकेश जयस्वाल, युवासनेचे  प्रतिक भालेराव, साई ढवळे, सागर राजपुत, संदीप तिवारी, सोहम सुर्वे, सुजय पाटील, आदेश वाघमारे, युवतीसेना कोअरकमिटी सदस्य पुजा लोंढे यांच्यासह युवासेना पदाधिकारी व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गाय ही आपल्यासाठी पूजनीय आहे. तिच्या गर्भात ३३ कोटी देवांचा वास असतो. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरात गायींचे पूजन करण्यात येईल. तसेच तिच्या देखभालीसाठी राज्य सरकारने अनुदान देण्याचा निर्णयही घेतला असून त्यामुळे गोमातेचे जतन केले जाईल. राज्य सरकारने देशी गायीला राज्यमाता – गोमाता म्हणून मान्यता दिल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. याबद्दल पुर्वेश सरनाईक यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानले. राज्यभरात युवा सैनिक गोशाळांना भेट देऊन ते गोमातेचे पूजन करतील. तसेच या शासन निर्णयाची प्रत गोशाळांना देण्यात येईल. युवासेनेच्या माध्यमातून या शासन निर्णयाची जनजागृती राज्यभरात करण्यात येईल, अशी माहिती पूर्वेश सरनाईक यांनी दिली.

 विद्यार्थ्यांनी पारसिक रेतीबंदर येथे साकारली मानवी साखळी

 महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला सफाई मोहिमेत सहभाग   ठाणे : ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात मंगळवारी पारसिक रेती बंदर येथे प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या साखळीचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात परिसरातील हजारो विद्यार्थी सहभागी झाले. प्लास्टिकमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ्या आकाराचा देव मासा आणि त्याच्या पोटात साठलेला प्लास्टिकचा कचरा हे प्रतिक साकारण्यात आले. तसेच, विद्यार्थ्यांनी प्लास्टिक न वापरण्याची प्रतिज्ञाही यावेळी केली. या उपक्रमास महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी भेट दिली. घोषवाक्यांसह सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले. याच निमित्ताने, पारसिक रेतीबंदर घाट येथे साफसफाई मोहिमेचेही आयोजन करण्यात आले होते. त्यात महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. विसजर्न घाटावर वाहून आलेले निर्माल्य, तरंगता कचरा यावेळी बाहेर काढण्यात आला. बुधवारी होणार सांगता ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाअंतर्गत गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या उपक्रमांची सांगता, तसेच स्पर्धांच्या पारितोषिक वितरणाचा सोहळा बुधवार, ०२ ऑक्टोबर रोजी उपवन तलावालगतच्या अॅम्फी थिएटर येथे होणार आहे. या सोहळ्यातही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन उपायुक्त (घनकचरा) मनीष जोशी यांनी केले आहे. 00000

 छुप्या पद्धतीने डिझेल विक्रीवर कारवाई होणार का?

खालापूर तालुक्यात भोलेनाथ धाब्यासह रुचिरा बियर शॉपीजवळील धंदा तेजीत राज भंडारी   रायगड : इंधनाचे दिवसेंदिवस भाव वाढत असल्याने अनेक वाहन चालक पर्यायी इंधनाचा वापर करत आहेत. खालापूर तालुक्यातील भोलेनाथ ढाब्यासह रुचिरा बियर शॉपीजवळ देखिल अशा पर्यायी आणि स्वस्त इंधनाची विक्री बेकायदेशिरपणे होत आहे. खालापूर तहसील कार्यालयातील पुरवठा  विभागाकडून कोणत्याही कारवाईचा बडगा उचलला जात नसल्यामुळे बेकायदेशीर डिझेल विक्री करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. यामध्ये पोलीस प्रशासन असो किंवा मग तहसील विभागाचे पुरवठा अधिकारी कारवाई करण्यासाठी मागे का ? असा सवाल उठवला जात आहे. सामान्य डिझेलच्या किमतीत आणि बायो डिझेलच्या किमतीतील तफावत अशा पद्धतीने व्यवसाय तेजीत आणत आहेत. डिझेल पंप चालकांना त्यामागे कर स्वरूपात शासनाला महसूल द्यावा लागतो, मात्र बायो डिझेल विक्री करणारे मोकाट रस्त्यांवर या डिझेलची विक्री करीत आहेत. राज्यात बायो डीझेल विक्रीवर प्रतिबंध असतानाही अनेक ठिकाणी बायो डिझेलची विक्री जोर धरत आहे. अशातच गेली अनेक वर्षे खालापूर तालुक्यात या डिझेलच्या विक्रीने उच्छाद मांडला आहे. चौक फाटा ते खालापूर या रस्त्यावर भोलेनाथ धाब्यासह रुचिरा बियर शॉपीजवळच्या मागील बाजूस लाखो लिटर बायो डिझेलची दिवसभर साठवणूक करून रात्रीच्या अंधारात विक्री करण्याचा प्रकार सुरू आहे. तसेच काही ठिकाणी टँकरमधून ऑईल चोरी देखील केली जात आहे. याठिकाणी पोलिसांची गस्त असते, मात्र रात्रीच्या सुमारास मोठमोठे कंटेनर या धाब्याच्या मागे का जात असावे किंवा मग टँकर या बियर शॉपीच्या मागे का जात असावे ? हे त्यांना दिसत नसावे का ? तसेच तहसील कार्यालयाच्या पुरवठा अधिकाऱ्यांचे त्यांच्या परिसरात लक्ष नाही का ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहेत. अशाच प्रकारे बेकायदेशिरपणे बायोडिझलची आणि ऑईलची खरेदी – विक्री करणाऱ्या खालापूर तालुक्यातील तस्करांना अभय दिले जात आहे. डिझेल विक्रीचा तसेच ऑईल विक्रीचा कोणताही परवाना नसतानाही बेकायदेशिर साठवणूक आणि विक्री केली जात असून यामध्ये कायदेशीर कारवाईची गरज समोर आली आहे. प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक अवैध कामांची माहिती पोलिसांसह तहसील विभागाला देण्यात येते, मात्र अनेक वर्षे हा धंदा तेजीत चालत असूनही येथील लोकप्रतिनिधींचे लक्ष या बेकायदेशीर कामांकडे जाऊ शकले नाही की मग लक्ष दिले जात नाही, असा संभ्रम होत असताना आता तरी पोलीस प्रशासन आणि तहसील विभाग कारवाई करणार का ? याकडे लक्ष लागून राहिले आहे. 0000