एकही विकेट न गमावता गाठले १२० धावांचे लक्ष्य
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानमधील हायव्होल्टेज सामना आज म्हणजे १ नोव्हेंबरला खेळवण्यात आला. हाँगकाँग सुपर 6 मध्ये दोन्ही संघांमध्ये शानदार सामना झाला. ज्यामध्ये पाकिस्तान संघाने भारतीय संघाचा ५ षटकांत पराभव केला आहे. यासह पाकिस्तानने पूल स्टेजमधील आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. यापूर्वी त्यांनी यूएई आणि आता टीम इंडियाचा पराभव केला आहे. हे दोन्ही सामने जिंकून पाकिस्तानने पुढील फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे.
हाँगकाँग सुपर 6 ही स्पर्धा ६ षटकांची असते आणि पाकिस्तानने अवघ्या ५ षटकांत संघाला पराभूत केलं आहे. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार फहीम अश्रफने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ६ षटकांत २ गडी गमावून ११९ धावा केल्या.
भारताने केलेल्या ११९ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने अवघ्या ५ षटकांत एकही विकेट न गमावता १२१ धावा केल्या. यासह पाकिस्तानने हा सामना मोठ्या सहजतेने जिंकला. या सामन्यात पाकिस्तानच्या सलामीवीरांनी अप्रतिम फलंदाजी केली. मोहम्मद अखलाक आणि आसिफ अली सलामीला उतरले होते आणि दोघांनीही पहिल्या षटकापासूनच वेगवान धावा केल्या. या सामन्यात मुहम्मद अखलाकने १२ चेंडूत ४० तर आसिफ अलीने १४ चेंडूत ५५ धावा केल्या. आसिफ अली रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर कर्णधार फहीम अश्रफ फलंदाजीला आला आणि त्याने ५ चेंडूत २२ धावा केल्या. यासह पाकिस्तानच्या सलामीच्या फलंदाजांनी स्वबळावर सामना संपवला.
रॉबिन उथप्पाच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ आपला पुढील सामना युएईविरुद्ध खेळणार आहे. हा सामना २ नोव्हेंबरला होणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. हा सामना जिंकणारा संघच पुढील फेरी गाठू शकेल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ६.५५ वाजता होणार आहे.
००००००