मुंबई : सिगारेट देण्यास नकार दिल्याने २९ वर्षीय तरुणावर तलवारीने हल्ला केल्याची घटना चेंबूर परिसरात घडली. उशेल रामलु निली असे जखमी तरूणाचे नाव असून या हल्ल्यात उशेल गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शताब्दी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. याप्रकरणी चेंबूरमधील आरसीएफ पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून हल्ल्यानंतर पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना अटक केली. सचिन ऊर्फ राहुल कनोजिया आणि अजय दीपक बनसोडे अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
चेंबूरमधील चेंबूर कॅम्प, गुरू सिंह सभा गुरुद्वारासमोर ही घटना घडली. उशेल निली हा रामटेकडी, नानक भोजवाणी गार्डन परिसरात वास्तव्यास असून तिथेच तो भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. तो दोन्ही आरोपीना ओळखत असून या परिसरात त्यांची प्रचंड दहशत होती. या दोघांनी मंगळवारी उशेलकडे सिगारेटची मागणी केली, त्याने सिगारेट देण्यास नकार दिला. याच कारणावरून त्यांनी त्याला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला ठार मारण्याची धमकी देत सचिनने त्याच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला. यावेळी उशेलने आरडाओरड केल्यानंतर तेथे नागरिक जमले.
या घटनेनंतर सचिन आणि राहुल पळून गेले. स्थानिक रहिवाशांनी जखमी उशेलला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. घटनेचे वृत्त समजताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उशेलच्या जबाबावरून पोलिसांनी सचिन कनोजिया आणि अजय बनसोडे या दोघांविरूद्ध हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.
सचिन आणि अजय हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. सचिनविरूद्ध मारामारीसह खंडणी, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, हत्येचा प्रयत्न, अपहरणासह आठ गुन्ह्यांची नोंद असून त्याच्यावर एक वर्षासाठी तडीपारची कारवाई करण्यात आली होती. अजयविरूद्ध हत्येच्या प्रयत्नासह अपहरण, लैगिंक अत्याचार व विनयभंगाच्या तीन गुन्ह्यांची नोंद आहे. अजयने दोन अल्पवयीन मुलीचा विनयभंगासह लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आरसीएफ पोलीस अधिक तपास करीत आहेत.
0000