कुमार व मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
अलिगड : महाराष्ट्राच्या दोन्ही संघाने ४३ व्या कुमार व मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेची विजयी सलामी दिली.
अलिगड (उत्तर प्रदेश) येथील महाराणी अहिल्याबाई होळकर स्पोर्टस स्टेडियमवर सोमवारी सुरू झालेल्या या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत कुमार व मुली गटांमध्ये प्रत्येकी ३० संघाने सहभाग घेतला आहे.
सलामीच्या सामन्यात महाराष्ट्र मुलांच्या संघाने विदर्भावर ३७-२६ असा ११ गुण आणि ५ मिनिटे राखून दणदणीत विजय मिळविला. मुलींच्या गटात महाराष्ट्राने मध्यप्रदेशवर ४०-१२ असा १ डाव आणि २८ गुणांनी धुव्वा उडविला.
मुलांच्या सामन्यात महाराष्ट्र संघाकडून विलास वळवीने २.४० मी. व १.३० मी. संरक्षण आणि आक्रमणामध्ये ४ गुण मिळवले. भरतसिंग वसावेने १.३० मिनिट संरक्षण करताना आक्रमणामध्ये २ गुणांची कमाई केली. कृष्णा बनसोडेने २.५९ मी. संरक्षण केले. आशिष गौतमने नाबाद २.१० आणि १.२० संरक्षण करताना आपल्या धारदार आक्रमणात ८ गुण टिपले. विदर्भ संघाकडून मोहित नेवरेने १.०० मी. संरक्षण केले. शैलेश कोरेटीने १.०० मी. संरक्षण करताना आक्रमणात ६ गुण मिळवले.
मुलींच्या सामन्यात प्रतीक्षा बिराजदारने ३.३० मी. संरक्षण करून आक्रमणात २ गुण मिळवले. अश्विनी शिंदे हिनेही ३.३० मी. संरक्षण करून ४ गुणांची कमाई केली. सुषमा चौधरीने ३.२० मी. संरक्षण करून आक्रमणामध्ये ४ गडी बाद केले. प्रणाली काळेने नाबाद १.१० मी. संरक्षण करून आक्रमणामध्ये १० गुणांची कमाई केली. तन्वी भोसलेने २.४० मी. वेळ नोंदवली.मध्यप्रदेश संघाकडून अक्षरा मालिनी आणि लक्ष्मीने प्रत्येकी एक मिनिटे वेळ नोंदवली.
मुलांच्या अन्य सामन्यात तामिळनाडूने चंदीगड वर एक डाव आणि ३४ गुणांनी विजय संपादन केला. आंध्र प्रदेशने मध्य भारतचा १६ गुणांनी पराभव केला. दिल्ली संघाने हिमाचल प्रदेशवर एक डाव आणि २१ गुणांनी मात केली. मुलींच्या गटात ओडिसाने मध्य भारतचा १ डाव २२ गुण राखून पराभव केला. राजस्थाने आंध्रप्रदेशवर एक डाव आणि १६ गुणांनी विजय संपादन केला.